एकेकाळी अमेरिकेशी टक्कर देणारा सोव्हिएत रशिया आता पुन्हा एकदा नवी उभारी घेण्याची प्रयत्न करत आहे. विविध माध्यमातून आपले अस्तित्व जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, संरक्षण क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे. याचाच एक भाग म्हणून रशियाने सोमवारी उपग्रहाचा वेध घेणारी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत जगात चर्चेत रहाण्याचा प्रयत्न केला आहे.
सुमारे ३५० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेला Kosmos-1408 या कृत्रिम उपग्रहाचा जमिनीवरुन क्षेपणास्त्र डागत रशियाने यशस्वीरित्या वेध घेतला. सुमारे एक टन वजनाचा Kosmos-1408 हा हेरगिरी उपग्रह १९८२ ला प्रक्षेपित करण्यात आला होता. काही वर्षांपूर्वी या उपग्रहाचा कार्यकाल संपला होता. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी म्हणजे ठराविक कालावधीनंतर करण्यात येणाऱ्या चाचणीचा एक भाग असल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे.
या चाचणीवर अमेरिकेने सडकून टीका केली आहे. ‘बेजवाबदार’ अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रशियाच्या या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे ३५० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर सुमारे १५०० तुकडे ( satellite debris ) तयार झाले असून ते आता पृथ्वीभोवती वेगाने प्रदक्षिणा घालत आहेत. यामुळे भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती अमेरिकेने व्यक्त केली आहे.
तर अमेरिकेची मुख्य अवकाश संशोधन संस्था ‘नासा’नेही स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या चाचणीमुळे ४०२ किलोमीटर उंचीवरुन दर ९० मिनिटांनी पृथ्वीप्रदक्षिणा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला धोका उत्पन्न झाला होता. सध्या या अवकाश स्थानकात अमेरिकेचे चार,एक जर्मनीचा आणि दोन रशियाचे असे एकुण ७ अंतराळवीर आहेत. या चाचणीमुळे अवकाश स्थानकासाठी आणीबाणी जाहिर करत सर्व अंतराळवीरांवर अवकाश स्थानकात एका सुरक्षित ठिकाणी दोन तास आसरा घेण्याची वेळ आली. चाचणीमुळे तयार झालेल्या तुकड्यांच्या स्थानाचा आढावा घेण्यात आल्यानंतर दोन तासांनी अवकाश स्थानकातील काम पुर्ववत सुरु करण्यात आले. अशा चाचणीमुळे स्वतःच्याच देशाच्या अंतराळवीरांना अडचणीत आणल्याबद्दल नासाने आश्चर्य व्यक्त केलं, संपुर्ण अवकाश स्थानकाला धोका निर्माण केल्याबद्द्ल नाराजी व्यक्त केली आहे.
सध्याच्या काळात उपग्रह भेदी क्षेपणास्त्र हे एक प्रमुख अस्त्र समजलं जातं, ऐन युद्धाच्या काळात हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा वेध घेण्याच्या क्षमतेमुळे युद्धाचे पारडं फिरवलं जाऊ शकतं. रशिया, अमेरिका, चीन आणि भारत या फक्त चार देशांकडेच ही क्षमता आहे.