युक्रेनच्या मुद्दय़ावरून पश्चिमी देशांशी वाद निर्माण झालेला असतानाच रशियाने बुधवारी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
कास्पियन समुद्राजवळील रशियाच्या प्रक्षेपण केंद्रावरून सोडलेल्या आरएस-१२ एम टोपोल आयसीबीएम या आंतरखंडीय क्षेपणास्त्राने निर्धारित लक्ष उद्ध्वस्त केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केल्याचे येथील वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
भविष्यातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी रशियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर एगेरोव यांनी स्पष्ट केल्याचे या वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
रस्तेमार्गाने कुठेही वाहून नेता येणाऱ्या आरएस-१२ एम टोपोल आयसीबीएम या क्षेपणास्त्राला १९८० मध्ये रशियाच्या सैन्यात दाखल करण्यात आले होते. १० हजार किमीचा पल्ला गाठणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या त्यानंतर वेळोवेळी या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मागील चाचण्या डिसेंबर आणि मार्चमध्ये घेण्यात आल्या होत्या.
तणाव कायमच
या महिन्याच्या सुरुवातीला सैन्य सरावादरम्यान रशियाने अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या.
दरम्यान, युक्रेन प्रकरणावरून रशिया आणि पश्चिमी देशांमधील संबंध तणावाचे झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर रशियाने क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केल्यामुळे तणाव वाढला आहे. या एकूण घडामोडींमुळे रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याचीही दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा