थकीत देयकांची रक्कम देण्याची मुदत उलटून गेल्यामुळे अखेर रशियाने युक्रेनचा गॅसपुरवठा तोडण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच गॅसच्या किंमतींबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्याही फिसकटल्या आहेत. त्यामुळे उभयदेशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयामुळे युरोपला होणाऱ्या गॅसच्या पुरवठय़ावर तातडीने फरक पडणार नाही. मात्र या प्रकरणी समाधानकारक तोडगा न निघाल्यास त्याचा फटका दूरोगामी इंधनपुरवठय़ास बसू शकतो. युक्रेनच्या नाफ्तोगॅस या कंपनीचे प्रमुख अँद्रीय कोबोलॉव्ह यांनी रशियाच्या या अडेलतट्टू भूमिकेमुळे युक्रेनचे काहीही अडणार नाही, युक्रेन त्यादृष्टीने समर्थपणे सज्ज आहे, असे म्हटले आहे.
तर आजवर रशियाला युक्रेनने एक छदामही दिला नसल्यामुळे यापुढे त्यांना गॅस किंवा अन्य इंधने हवी असतील तर आगाऊ देयक भरणा करावा लागेल, अशी भूमिका रशियाने घेतली आहे. रशियाने जास्तअडवणुकीची भूमिका घेऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय समुदाय प्रयत्नशील असला तरी इराक आणि रशियाच्या या निर्णयामुळे तेलाच्या किंमती भडकणार असल्याचे म्हटले जात आहे.