गेल्या १० दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये ३३१ नागरिक ठार झाले. त्यात १९ मुलांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या ६७५ आहे. (युक्रेन आणि रशिया युद्धाच्या लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ) युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क कार्यालयाकडून शुक्रवारी व्यक्त करण्यात आली. दुसरीकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडलंय. अशातच रशियाने युद्धविरामाची महत्वाची घोषणा केली आहे.
Ukraine War: “आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी
“युद्धाच्या १०व्या दिवशी रशियाने युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. रशियाने नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावं, यासाठी मानवतावादी मार्ग उघडण्यासाठी 06:00 GMT पासून युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित केला आहे,” असे वृत्त रशियाचे मीडिया आउटलेट स्पुतनिकने दिले आहे.
दरम्यान, मारियुपोल आणि वोलनोवाखा येथील रहिवाशांना बाहेर काढू देण्यासाठी युद्धविरामाची घोषणा केल्याचं रशियाने म्हटलंय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी युद्धविराम जाहीर केला आहे. ज्यात रशियन सैन्याने वेढा घातलेल्या मारियुपोल शहरांतील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची परवानगी दिली आहे.
“आज, ५ मार्च रोजी मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी १० वाजल्यापासून रशियाने युद्धबंदीची घोषणा केली आणि मारियुपोल तसेच वोलनोवाखा येथून नागरिकांच्या बाहेर पडण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडले,” असे वृत्त स्पुतनिक वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाचा हवाला देऊन दिले.