Russia Missile Attack : युक्रेनमधील एका भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर १२ एप्रिल रोजी रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला होता. एवढंच नाही तर भारतीय व्यवसायांना जाणूनबुजून लक्ष्य केल्याचंही म्हटलं होतं. यासंदर्भात रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता या संदर्भात रशियाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतातील रशियन दुतावासाने यावर भाष्य केलं आहे. कीवमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा युक्रेनचा आरोप रशियन दुतावासाने फेटाळून लावला आहे.
भारतातील रशियन दुतावासाने युक्रेनियन दुतावासाच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे की, “रशियाच्या सशस्त्र दलांनी १२ एप्रिल २०२५ रोजी कीवच्या पूर्व भागात असलेल्या भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर हल्ला केला नव्हता. तसेच कोणताही हल्ला करण्याची योजना देखील आखली नव्हती”, असं रशियन दुतावासाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
भारतातील युक्रेनियन दुतावासाने १२ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, “रशियाने क्षेपणास्त्राने एका भारतीय कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त केले आहे. भारताशी खास मैत्री असल्याचं सांगत मॉस्कोकडून सातत्याने भारतीय व्यवसायांना लक्ष्य केलंय जातंय. वृद्ध आणि लहान मुलांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधांना नष्ट करण्यात आलं आहे”, असं युक्रेनियन दुतावासाने म्हटलं होतं.
दरम्यान, या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर आज (१८ एप्रिल) रशियाने हा दावा फेटाळून लावला आहे. रशियन दुतावासाने म्हटलं आहे की, “रशियाच्या सैन्याने त्या दिवशी कीवच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या विमान वाहतूक, लष्करी विमानतळ, चिलखती वाहन दुरुस्ती कार्यशाळा आणि ड्रोन असेंब्ली युनिट्ससारख्या युक्रेनियन लष्करी स्थळांना लक्ष्य केलं होतं. पण युक्रेनियन हवाई संरक्षण यंत्रणेने डागलेले क्षेपणास्त्र चुकून कुसुम हेल्थकेअर गोदामावर आदळलं आणि आग लागली.” दरम्यान, रशियाने जाणूनबुजून नागरी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचा आरोप फेटाळून लावत रशियन दुतावासाने स्पष्ट केलं की, “आम्ही स्पष्ट करतो की विशेष लष्करी कारवाईदरम्यान रशियन सशस्त्र दलांनी कधीही नागरी सुविधांना लक्ष्य केलेलं नाही.
कुसुम कंपनी काय आहे?
कंपनीच्या वेबसाइटनुसार, कुसुम हा एक औषध कंपन्यांचा एक बहुराष्ट्रीय गट आहे ज्यामध्ये युक्रेन, भारत, मोल्दोव्हा, कझाकस्तान, उझबेकिस्तान, फिलीपिन्स, म्यानमार, मेक्सिको आणि केनियामध्ये २००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कुसुमद्वारे चार आधुनिक उत्पादन सुविधा दिल्या जातात. त्यापैकी तीन सुविधा भारतात असून एक युक्रेनमध्ये आहे.