‘वॅग्नेर’ या खासगी लष्करी गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी रशियन लष्करी नेतृत्वाचा नि:पात करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याचा इशारा दिला. रशियन लष्कराने आपल्या लोकांवर हल्ले सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला अडचणीत आणणाऱ्या सर्वाना आम्ही नष्ट करू, असा निर्धारही प्रिगोझिन यांनी व्यक्त केला.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना प्रिगोझिन यांनी दिलेले आव्हान सर्वात धाडसी ठरणार आहे. या संघर्षांत आपल्या सैन्याने रशियन लष्कराचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा प्रिगोझिन यांनी केला. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणात प्रिगोझिन यांच्या सैन्याचा सिंहाचा वाटा होता. प्रिगोझिन क्रौर्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक युद्ध गुन्हे आहेत. रशियाच्या महान्याय अभिकर्त्यांनी म्हटले आहे, की प्रिगोझिन यांनी केलेल्या सशस्त्र बंडाची चौकशी सुरू आहे. त्याची फलनिष्पत्ती काय होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. तरीही त्यांनी रशियन लष्करी नेतृत्वाला दिलेल्या आव्हानामुळे रशियांतर्गत वाढत्या विसंवादाचे आणि अस्थैर्याची चिन्हे दिसत आहेत.
क्रेमलिनचे खाद्यपुरवठादार ते सैन्य कंपनीची मालकी
येवजेनी प्रिगोझिन हे खासगी सैन्याचे प्रमुख-सर्वेसर्वा आहेत. त्यांना पुतिन यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी मानले जात होते. प्रिगोझिन यांच्या मालकीची उपाहारगृहे आणि खाद्यसेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. रशियन सत्ताकेंद्र क्रेमलिनला प्रिगोझिन यांच्या कंपन्या खाद्यसेवा पुरवत असतात. त्यामुळे त्यांना पुतिन यांचे ‘शेफ’ असेही संबोधले जाते. तत्कालीन सोविएत संघात एकदा प्रिगोझिन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता व ते दोषी ठरले होते. त्यांच्या नियंत्रणाखाली काही प्रभावशाली कंपन्या आहेत. यात ‘वॅग्नेर’ या रशियन सरकारचा पाठिंबा असलेले खासगी सशस्त्र दल आहे. तसेच इतर तीन कंपन्या आहेत. या कंपन्यांनी २०१६ आणि २०१८ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकांत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे.
वॅग्नेरच्या कारवाया..
२०१४ मध्ये प्रिगोझिन यांच्या पाठबळाने ‘वॅग्नेर’ची स्थापना झाल्याचे समजते. या समूहाचे खासगी सशस्त्र दल आहे. या संदर्भातील कंत्राटे घेण्याचे काम या कंपनीने सुरू केले. सिरिया, लिबिया आणि युक्रेन संघर्षांत ‘वॅग्नेर’चा सहभाग होता. या सैन्याविरुद्ध मानवाधिकारांचे उल्लंघन, मानवी छळ, हत्यांचा आरोप आहे. २०१६ मधील अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करून ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचार व मतदारांत मतभेद वाढवणाऱ्या ‘इंटरनेट रिसर्च एजन्सी’मागेही (आयआरए) प्रिगोझिन यांचा हात असल्याचा आरोप आहे. प्रिगोझिन यांच्या कारवायांमुळे अमेरिका आणि युरोपीयन संघातर्फे त्यांच्यावर प्रतिबंध लादण्यात आले आहेत. गुन्हेगारी आरोपांसंदर्भात त्यांची सध्या अमेरिकन न्याय विभागाकडून चौकशी सुरू आहे. प्रिगोझिन एक वादग्रस्त व्यक्ती असले तरी सामर्थ्यशाली व प्रभावी आहेत.
पुतिन यांच्याशी जवळीक
प्रिगोझिन यांचा जन्म तत्कालीन लेनिनगार्ड (सध्याचे सेंट पीटसबर्ग) येथे १९६१ मध्ये झाला. त्याचे बालपण खडतर परिस्थितीत गेले. बालगृहात आणि नंतर बाल सुधारगृहात त्यांच्या बालपणाचा बराच काळ गेला. तेथून मुक्त झाल्यानंतर, त्यांनी स्वयंपाकी म्हणून काम केले आणि नंतर सेंट पीटर्सबर्गमध्ये स्वत:चे उपाहारगृह सुरू केले. २००० च्या दशकाच्या प्रारंभी त्याने शालेय विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना खाद्यसेवा पुरवण्याची सरकारी कंत्राटे मिळवण्यात यश मिळवले. पुतिन हे सेंट पीट्सबर्गचे महापौर असताना, प्रिगोझिन त्यांचे निकटचे सहकारी बनले.
रशियाचा विश्वासघात -पुतिन
खासगी तैनाती सैन्याचे प्रमुख येव्हजिनी प्रिगोझिन यांनी रशियाविरोधात केलेल्या सशस्त्र बंडापासून रशियाचे संरक्षण करण्याचा निर्धार रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी व्यक्त केला. प्रिगोझिन यांनी युक्रेनमधील आपले सैनिक मॉस्कोच्या दक्षिणेकडील प्रमख शहरात घुसविले आहेत. या घडामोडी म्हणजे रशियाच्या पाठीत विश्वासघाताचा खंजिर खुपसणे आहे, असे पुतिन म्हणाले. दोन दशकांतील पुतिन यांच्या नेतृत्वाला मिळालेले हे सर्वात मोठे आव्हान आहे. पुतिन यांनी प्रिगोझिन यांचे नाव घेतले नाही, पण त्यांचा उल्लेख विश्वासघातकी, देशद्रोही असा केला. या बंडात सामील झालेल्या सर्वानाच शिक्षा होणे अटळ आहे, असे त्यांनी बजावले. त्यासाठी लष्कर आणि सरकारस्तरावर आदेश दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. पाश्चिमात्य देशांची संपूर्ण यंत्रणा, सैन्य आणि अर्थबळा रशियाविरुद्ध लावण्यात आले आहे, असा दावाही त्यांनी केला.
वाईट वागणाऱ्यांचा आत्मघात होतोच!
‘‘जो कोणीही वाईट मार्ग निवडतो तो स्वत:चाही नाश करतो. रशियाने दीर्घकाळ आपल्या सरकारचा मूर्खपणा आणि कमकुवतपणा सरकारचा मूर्खपणा लपवण्यासाठी आटापिटा केला. खोटा प्रचार केला. मात्र, तेथील अराजकाचे वास्तव आता जगासमोर आले आहे. आता रशिया कितीही खोटे दावे करो, सत्य लपणार नाही. रशियाचा सर्व कमकुवतपणा उघड झाला आहे. रशिया जितका दीर्घ काळ आपले सैन्य आणि भाडोत्री सैनिक युक्रेनमध्ये तैनात ठेवेल, तितक्याच अराजकाला, वेदनादायी समस्या रशिया स्वत:साठी निर्माण करेल.’’ – वोलोदिमिर झेलेन्स्की, युक्रेनचे अध्यक्ष
नागरिकांना झळ पोहोचू नये
रशियाने युक्रेनवर लादलेल्या अवैध युद्धामुळे संभाव्य अस्थैर्य निर्माण करणारे परिणाम दिसत आहेत. त्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्षात येत असताना दिसू लागले आहे, त्यावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. आम्ही आमच्या मित्रराष्ट्रांच्या संपर्कात आहोत. मी त्यापैकी काही राष्ट्रप्रमुखांशी यासंदर्भात चर्चा करणार आहे. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब अशी, की संबंधित सर्व जबाबदार घटकांनी नागरिकांचे संरक्षण आणि हितरक्षण करावे.
– ऋषी सुनक, ब्रिटनचे पंतप्रधान
‘नाटो’ची घडामोडींवर नजर
नॉर्थ अटलांटिक ट्रीअटी ऑर्गनायझेशन’ (नाटो) रशियात होत असलेल्या घडामोडींवर नजर ठेवून आहे.
– ओना लुंगेस्कू, ‘नाटो’च्या प्रवक्त्या
फ्रान्स युक्रेनच्या पाठीशी ठाम!
अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन रशियामधील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत. या सर्व परिस्थिती आमचा युक्रेनला पाठिंबा देण्यावर भर आहे. – एलिसी पॅलेस, फ्रान्सच्या अध्यक्षीय कार्यालय अधिकारी