रशियाच्या युक्रेनविषयक धोरणाच्या निषेधार्थ पाश्चात्त्य देशांनी घातलेल्या र्निबधाच्या विरोधात रशियाने गुरुवारी अचानक या देशांमधून येणाऱ्या अन्नपदार्थावर बंदीची घोषणा केली. या बंदीमुळे अमेरिका, कॅनडा, युरोपीय राष्ट्रे, ऑस्ट्रेलिया आदींना अब्जावधी डॉलरचा फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे रशियातही अन्नटंचाईसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ आपण आपली हवाई हद्द बंद करण्यासह आणखीही अनेक उपाय योजू शकतो, अशी धमकीही रशियाने दिली आहे.
रशियामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे, युरोपीय राष्ट्रे तसेच अमेरिकेतून फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे, मांस आदी पदार्थाची अब्जावधी डॉलरची आयात होत असते. या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आज केली. ही बंदी एक वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. या बंदीचा मोठा फटका ऑस्ट्रेलिया, युरोपीय देश, कॅनडासह अमेरिकेला बसणार आहे. रशियात एकटय़ा अमेरिकेतून सुमारे १३० कोटी डॉलरची तर युरोपीय देशांमधून १५८० कोटी डॉलरची आयात दरवर्षी होत असते. रशियातील राष्ट्रवादी शक्ती युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्याची आग्रही मागणी करीत आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अद्याप ती मान्य केली नसली तरी आर्थिक युद्धाच्या नौबती मात्र त्यांनी या बंदीद्वारे वाजवल्या असल्याचे मानले जात आहे. रशियाने गेल्या मार्च महिन्यात युक्रेनमधील क्रायमिया हा प्रांत आपल्यात समाविष्ट करून घेतला असून तेथील व पूर्व युक्रेनमधील बंडखोरांना रशिया शस्त्रपुरवठा करीत असल्याचा पाश्चिमात्य देशांचा आरोप आहे. रशियाला अर्थातच हा आरोप मान्य नसून युक्रेनचे सरकार बंडखोरी मोडून काढण्यासाठी अनन्वित अत्याचार करीत असल्याचा त्याचा दावा आहे. दरम्यान, पाश्चिमात्य राष्ट्रांनी घातलेल्या र्निबधाच्या विरोधात आम्ही बरेच काही करू शकतो, असे सांगत मेदवेदेव यांनी हवाई हद्द बंद करण्याचाही इशारा दिला.
जशास तसे
रशियाने आपली हवाई हद्द आंतरराष्ट्रीय विमानांसाठी बंद केली तर त्याचा मोठा फटका लुफ्तान्सा, ब्रिटिश एअरवेज, एअर फ्रान्स, फिनएअर आदी युरोपीय विमान कंपन्यांना बसू शकतो. युरोपमधून आशियात जाणारा हवाई मार्ग रशियाच्या हवाई हद्दीतून जातो. रशियाने तेथून जाण्यास बंदी घातल्यास विमानांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. असे झाल्यास प्रत्येक विमानावर किमान ३० हजार डॉलरचे अधिकचे इंधन खर्ची करावे लागेल, असा अंदाज ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच’ने वर्तवला आहे. मात्र या बंदीमुळे रशियाचेही मोठे नुकसान होऊ शकते. याचे कारण या हवाई हद्दीतून जाण्यासाठीचे शुल्क म्हणून युरोपियन विमान कंपन्या एअरोफ्लोटला दरवर्षी सुमारे २५ ते ३० कोटी डॉलर एवढी रक्कम देतात.

Story img Loader