एपी, मॉस्को

युक्रेनच्या पश्चिमी मित्रदेशांना इशारा म्हणून रशियाच्या आण्विक सिद्धांतात बदल करण्यात आले आहेत, असे रशियाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. रशियावरील हल्ल्याला कुठलेही सहकार्य त्यांनी देऊ नये, यासाठी हा बदल केल्याचे रशियाने म्हटले आहे.

रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सांगितले, की आण्विक सिद्धांतामधील बदल हा रशियावर कुणी हल्ला केल्यास संभाव्य धोक्याचा इशारा देण्यासाठी आहे. रशियावर हल्ला केल्यास अथवा हल्ल्यामध्ये सहभागी झाल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव व्हावी, यासाठी बदल केले आहेत. हा हल्ला केवळ आण्विकच असेल, असे नाही. कुठल्याही अण्वस्त्रधारी देशाच्या पाठिंब्याने रशियावर झालेला पारंपरिक हल्लाही दोन्ही देशांचा संयुक्त हल्ला समजला जाईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे. रशियाच्या सार्वभौमत्वाला गंभीर धोका पोहोचल्यास रशिया अण्वस्त्र वापरेल, असा इशारा पुतिन यांनी दिला.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन तीन वर्षे होत असून, रशिया हळूहळू युद्धामध्ये आपला वरचष्मा दाखवीत आहे. अमेरिकेच्या शस्त्रांच्या सहाय्याने रशियावर हल्ला करू नये, असे अमेरिकेने युक्रेनला बजावले आहे. त्यामुळे युक्रेनची कोंडी झाली आहे. युक्रेनने दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियावर डागण्यासंदर्भात अमेरिकेला विचारले होते.

हेही वाचा >>>जगाचं काही खरं नाही: एकीकडे रशियाची अण्वस्त्रांची धमकी, दुसरीकडे अमेरिकेचा युक्रेनला ८ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा

युक्रेनवर क्षेपणास्त्र, ड्रोनने मारा सुरूच

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा सुरूच आहे. युक्रेनची सुरक्षा यंत्रणेची फळी या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. रशियाने कीव्हवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने बुधवारी पाच तास लक्ष्य केले. यात युक्रेनचे विजेचे ग्रीड लक्ष्य करण्यात आले. युक्रेनच्या ७० टक्के वीजनिर्मितीवर त्यामुळे परिणाम झाला. काही भागात वीजपुरवठा पूर्ण ठप्प झाला. त्यामुळे ब्लॅक-आउटचीच स्थिती या ठिकाणी होती. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. गॅस पाइप, २० कारचे या हल्ल्यात नुकसान झाले.