Pahalgam Terror Attack Updates Today : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. मंगळवारी दुपारच्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा भारतीयांनी तीव्र निषेध केलेला असताना जगभरातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून याप्रकरणी भारतासोबत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे व्लादिमीर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आणि इतर जागतिक नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या रिसॉर्ट शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन कुरणात हा हल्ला झाला. या हल्लाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या जनतेला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना खोलवर सहानुभूती आहे.” या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी फोनवरून संपर्क साधला होता.

“काश्मीरमधून खूप त्रासदायक बातमी समोर आली आहे. दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यासाठी आणि जखमींना बरं वाटावं याकरता प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि खोल सहानुभूती आहे”, असं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यानच हा हल्ला झाला आहे. त्यांनीही या प्रकरणी शोक व्यक्त केला.

“उषा आणि मी भारतातील पहलगाम येथे झालेल्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून या देशाच्या आणि लोकांच्या सौंदर्याने आम्ही भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करताना आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत”, असे व्हॅन्स यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

रशिया, UAE, UK, इस्रायलच्या नेत्यांकडूनही निषेध

रशिया, युएई, यूके, फ्रान्स, इस्रायल, इराण आणि इतर अनेक जागतिक नेत्यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. रशियन दूतावासाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपती पुतिन यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी भारतासोबत वचनबद्ध असल्याचं म्हटलं.

“पहलगाम शहराजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विविध देशांचे नागरीक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्याप्रती शोक व्यक्त करतो. या क्रूर गुन्ह्याचे कोणतेही समर्थन असू शकत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की या हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा होईल. दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्धच्या लढाईत आम्ही भारताबरोबर आहोत”, असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी म्हटल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

तर, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी एक्स वर पोस्ट केले की, “आज काश्मीरमध्ये झालेला भयानक दहशतवादी हल्ला अत्यंत विनाशकारी आहे. माझ्या संवेदना प्रभावित झालेल्यांसोबत, त्यांच्या प्रियजनांसोबत आणि भारतातील लोकांसोबत आहेत.”

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) अशा गुन्हेगारी कृत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून सुरक्षा आणि स्थिरता कमी करण्याच्या उद्देशाने सर्व प्रकारच्या हिंसाचार आणि दहशतवादाचा प्रतिकार केला.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना खूप दुःख झाले आहे आणि त्यांनी भारत सरकार आणि जनतेसोबत एकता व्यक्त केली आहे.

इराणी दूतावासाने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नवी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण दूतावासाकडून जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. आम्ही भारत सरकार आणि जनतेप्रती, विशेषतः या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांबद्दल, मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.”

भारतातील फ्रान्सचे राजदूत थिएरी माथू म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांचा देश भारतासोबत एकजुटीने उभा आहे. जम्मू आणि काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. माझ्या संवेदना पीडितांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत फ्रान्स भारतासोबत एकजुटीने उभा आहे. #पहलगाम,” असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला आपल्या देशाचा पाठिंबा जाहीर केला.