रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दिड वर्षापासून युद्ध चालू आहे. हे युद्ध कधी थांबणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांनी एकमेकांवर कुठलाही मोठा हल्ला केला नव्हता. परंतु, शुक्रवारी (२९ डिसेंबर) रशियाने युक्रेनवर तब्बल १२२ क्षेपणास्रं डागली. यासह ३६ ड्रोन हल्ले केले. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनमधील २७ नागरिकांचा बळी गेला आहे. युक्रेनच्या वायूदलातील एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, या युद्धकाळात रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख वलेरी जालुजनी म्हणाले, आमच्या वायूदलाने रशियाचे बहुतांश हल्ले हवेतच हाणून पाडले. रशियाची ८७ क्षेपणास्रं आणि २७ ड्रोन प्रतिहल्ल्यात पाडले. दरम्यान, रशियाच्या या हल्ल्यात २७ युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, आज लाखो युक्रेनी नागरिक क्षेपणास्रं हल्ले, ड्रोन हल्ले आणि स्फोटांच्या तीव्र आवाजाने जागे झाले. परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले, राजधानी कीवमध्ये झालेल्या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनच्या वायूदलाचे प्रमुख मायकोला ओलेशचुक यांनी त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर लिहिलं आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या या युद्धानंतर रशियाने युक्रेनवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. याआधी रशियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये युक्रेनवर ९६ क्षेपणास्रं डागली होती. युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख म्हणाले, या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक इमारती, औद्योगिक वसाहती आणि सैन्यतळांचं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा >> फाशीची शिक्षा रद्द, पण तुरुंगवास कायम! भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना इतकी वर्ष राहावं लागणार तुरुंगात

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी रशियाच्या बाजूने कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. रशियाने आतापर्यंत नागरिकांवरील कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia launched 122 missiles on ukraine killed 27 civilians asc