तालिन (एस्टोनिया) : रोख रकमेची बक्षिसे व आकर्षक लाभाच्या आश्वासनांच्या जाहिराती करत रशियाने युक्रेन युद्धासाठी देशांतर्गत भरतीची व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बेरोजगारांना आकर्षित केले जात आहे. संपूर्ण रशियात लष्कर भरतीसाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. युक्रेनमधील युद्धासाठी कुमक वाढवण्यासाठी रशियन यंत्रणा विविध योजना राबवत आहेत. बाख्मुतसारख्या युक्रेनियन रणांगणांमध्ये संघर्ष चिघळत असताना दोन्ही बाजूंनी संघर्षांची तयारी केली आहे. त्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे रशियाला नव्या भरतीची निकड भासत आहे.
सप्टेंबरमध्ये रशियातील तीन लाखांच्या राखीव दलास चालना देण्यासाठी लष्करी यंत्रणेकडून यापैकी काही जणांना दूरध्वनी केल्याने देशभरातील राखीव दलात नोंदणी केलेल्यांमध्ये घबराट पसरली. कारण रशियातील ६५ वर्षांखालील बहुतांश पुरुष राखीव दलाचा भाग आहेत. भरती केंद्रांवर जाण्याऐवजी हजारो नागरिकांनी रशियातून पलायन करणे पसंत केल्याचे वृत्त आहे. युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम राबवण्यासाठी राखीव दलाचा वापर करण्याचा तूर्तास विचार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. राखीव दलाच्या वापरासंदर्भात संदिग्धता असताना रशियन सरकार रशियन नागरिकांना स्वयंस्फूर्तपणे भरतीसाठी आवाहन करत आहे. विविध प्रांतांतील तात्पुरत्या भरती केंद्रांवर किंवा नोंदणी अधिकारी दूरध्वनी करून ही मोहीम राबवत आहेत.