एपी, कीव : युक्रेनची राजधानी कीव्हचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू असताना रशियाने या शहरावर सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी कीव्ह शहरात झाली होती. तेव्हाच हा हल्ला झाला, त्यात एक नागरिक मृत्युमुखी पडला. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने केलेला हा सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला होता.
रशियाने शनिवारी रात्री इराणी बनावटीच्या ‘शाहेद ड्रोन’द्वारे कीव्हवर हा सर्वात मोठा हल्ला केला, असे कीव्ह येथील युक्रेनचे लष्करी अधिकारी सेर्ही पोप्को यांनी सांगितले. हा हल्ला पाच तासांपेक्षा जास्त काळ चालला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ४० हून अधिक ‘ड्रोन’ पाडले. कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले, की या हल्ल्यात एक सात मजली अनिवासी इमारत कोसळली व तिला आग लागली. या ढिगाऱ्याखाली एक ४१ वर्षीय नागरिक मृत्युमुखी पडला. एक ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले, की शनिवारी रात्रीही युक्रेनवर ‘शाहेद ड्रोन’चा सर्वात मोठा हल्ला झाला. ५४ ‘ड्रोन’द्वारे हल्ला करण्यात आला. त्यापैकी ५२ ‘ड्रोन’ हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे पाडण्यात आले. ईशान्येकडील खार्किव प्रांताचे प्रांतपाल ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले, की, रशियाकडून झालेल्या दोन वेगवेगळय़ा हल्ल्यांत एक ६१ वर्षीय महिला आणि ६० वर्षीय पुरुष मृत्युमुखी पडला. युक्रेनच्या अध्यक्षांचे मुख्य सहाय्यक आंद्री येरमाक यांनी ‘टेलिग्राम’वर सांगितले, की युक्रेनचा इतिहास असुरक्षित रशियनांना दीर्घ काळापासून अस्वस्थ करत आहे. सेर्ही पोप्को यांनी सांगितले, की आज, शत्रूने कीव्हच्या वर्धापनदिनी कीव्हवासीयांचे अभिनंदन प्राणघातक मानवरहित हवाई हल्ल्याद्वारे करण्याचा निर्णय घेतला.
‘वर्धापनदिनी ठरवून लक्ष्य’
‘कीव्ह दिन’ हा कीव्हच्या अधिकृत स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. शहराच्या या वर्धापन दिनानिमित्त गाण्याच्या वाद्यवृंदाच्या मैफली, रस्त्यावर जत्रा, प्रदर्शने आणि रोषणाई-फटाक्यांसह साजरा केला जातो. कीव्हचा हा एक हजार ५४१ वा वर्धापनदिन यंदा धुमधडाक्यात न होता थोडय़ा सौम्य स्वरूपात होणार होता. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोन हल्ल्यासाठी रशियाने निवडलेली वेळ योगायोग नसून, ठरवून हा हल्ला झाला आहे.