अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कदाचित रशियाने ढवळाढवळ केली असावी असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पाच महिन्यांनी पहिल्यांदाच ट्रम्प यांनी या विषयावरचे मौन सोडले आहे. असे असले तरीही, ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या आधी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना देण्यात आली होती, त्यांनी मात्र या सगळ्याबाबत मौन बाळगणे पसंत केले. त्याचमुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुूकीत रशियाने हस्तक्षेप केला असावा अशी शक्यता ट्रम्प यांनी बोलून दाखवली आहे.
बराक ओबामा यांना या सगळ्या प्रकाराची कुणकुण ऑगस्ट २०१६ मध्येच लागली होती. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होती, त्यामुळे रशियाचा हस्तक्षेप ते थांबवू शकत होते, तरीही त्यांनी तसे केले नाही असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रशियाच काय इतर देशांनाही कदाचित या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला असण्याची शक्यता आहे, CIA या गुप्तचर संस्थेने बराक ओबामा यांना या प्रकाराची पूर्ण कल्पना दिली होती. तरीही त्यांनी आवश्यक ती कोणतीच पावलं उचलून हा सगळा प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांच्याकडे पुरेसा वेळ असूनही याप्रकरणी त्यांनी मौन बाळगले हे ओबामांचे अपयश आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
माझ्याविरोधात हिलरी क्लिंटन उभ्या होत्या, त्याच जिंकून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसतील अशी खात्री सगळ्यांना त्यावेळी वाटत होती. ओबामा यांच्या गप्प बसण्याचेही कारण हेच असावे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. २०१६ मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला असा संशय अमेरिकेतल्या गुप्तचर यंत्रणांना आहे. त्यांचा त्या अनुषंगाने तपासही सुरू आहे, अशात आता शुक्रवारी होणाऱ्या G20 परिषदेत डोनाल्ड ट्रम्प व्लादिमिर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट होणार आहे. या भेटी आधीच ट्रम्प यांनी ओबामांवर ताशेरे झाडत रशियाच्या हस्तक्षेपाबाबत आपले मौन सोडले आहे.
२०१६ च्या अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्यासाठी मॉस्कोत काही विशेष अभियान चालवण्यात आले का? असाही संशय गुप्तचर यंत्रणांना आहे मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याआधीच ट्रम्प यांनी एफबीआयचे जेम्स कोमी यांची संचालक पदावरून हकालपट्टी केल्याचे जगाने पाहिले आहेच. तसेच जेम्स कोमी फितुर झालेत असेही ट्विट ट्रम्प यांनी केले होते. आता पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला असावा अशी शक्यता ट्रम्प यांनी वर्तवली आहे.