एपी, कीव्ह (युक्रेन) ; रशियाने सलग दुसऱ्या दिवशी युक्रेनमधील ऊर्जा सुविधा, निवासी इमारती आणि औद्योगिक वसाहतींवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला. यात किमान चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे थंडी वाढत असताना विजेच्या टंचाईचा सामना युक्रेनच्या नागरिकांना करावा लागत आहे.
प्रत्यक्ष रणांगणावर माघार घ्यावी लागत असलेल्या रशियाने युक्रेनमधील शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि आत्मघातकी ड्रोनचे हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार किमान रशियाची दोन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि पाच इराणी ड्रोन नष्ट करण्यात हवाई सुरक्षा यंत्रणेला यश आले. गेल्या महिन्यात झालेल्या माऱ्यापेक्षा यावेळी युक्रेनची हवाई सुरक्षा अधिक चांगली असल्याचे दिसत असले तरी हे कडे भेदून अनेक क्षेपणास्त्रे महत्त्वाच्या ठिकाणांचा वेध घेत आहेत. दक्षिणेकडील ओडेसा आणि निपो शहरांमध्ये काही आठवडय़ानंतर प्रथमच गुरुवारी हल्ले झाले.
धान्य करारास मुदतवाढ
काळय़ा समुद्रामार्गे युक्रेनमधून धान्याची निर्यात सुरू ठेवण्याच्या करारास मुदतवाढ मिळाल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी जाहीर केले. तुर्कस्थानच्या मध्यस्थीने संयुक्त राष्ट्रे, रशिया आणि युक्रेनमध्ये हा करार झाला आहे. इस्तंबुलमध्ये या करारावर सर्व पक्षांनी गुरुवारी स्वाक्षऱ्या केल्या. अन्नधान्य आणि खतांचा पुरवठा अबाधित सुरू राहावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू राहतील, असे गुटेसेस यांनी यावेळी जाहीर केले.