रशियाची राजधानी मॉस्को शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ११५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मॉस्को शहरातील या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे. रशियातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी १४५ जखमींची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर रशियातील विविध भागात लष्कर तैनात करण्यात आले आहे.
रशियावरील दहशतवादी हल्ल्याचे कारण काय?
मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने स्वीकारली. मात्र, या दहशतवादी हल्ल्याची कारणे काय? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गेली दोन वर्षे रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरू आहे. यामुळे रशियाशी काही देशांचे संबंध ताणले गेले आहेत. तसेच तज्ञांनी सांगितले की, इस्लामिक स्टेट ग्रुपने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विरोध करत गेल्या दोन वर्षांपासून रशियावर लक्ष केंद्रित केले आहे. रशिया हा मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचे इस्लामिक स्टेट ग्रुपचे म्हणणे आहे.
रशियाला का लक्ष्य केले?
इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला करून रशियाशी असलेले शत्रुत्व अधोरेखित केले आहे. रशियाला लक्ष्य करण्याचे कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी हस्तक्षेपाशी संबंधित असू शकते. तसेच रशियाला मुस्लिमांवर अत्याचार करणारा देश म्हणून इस्लामिक स्टेट हा गट पाहत असल्याचे कारण सांगितले जात आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये हस्तक्षेप केला होता. सीरियाचे अध्यक्ष बाशर असाद यांच्या मदतीसाठी व्लादिमीर पुतिन यांनी काही रशियन सैन्य पाठवले होते. त्यामुळे इस्लामिक स्टेट ग्रुपने रशियाच्या कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबरोबरच व्लादिमीर पुतिन यांनी सीरियासाठी जे धोरण राबवले, त्याला विरोध म्हणून रशियावर दहशतवादी हल्ला केल्याची शक्यता आहे.
काय आहे इस्लामिक स्टेट खुरासान?
इस्लामिक स्टेट खुरासान (ISIS-K) ही एक दहशतवादी संघटना आहे. इस्लामिक स्टेट खुरासान या संघटनेने यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. यामध्ये मशिदींवरील विनाशकारी बॉम्बस्फोट, काबूलमधील रशियन दूतावासावरील प्राणघातक हल्ला, तसेच २०२१ मध्ये काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्याचा समावेश आहे.
व्लादिमीर पुतिन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष
काही दिवसांपूर्वी रशियामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले. या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी ही निवडणूक ८८ टक्के मतांनी जिंकली. व्लादिमीर पुतिन पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अगदी काही दिवसांत मॉस्को शहरात दहशतवादी हल्ला झाला.