आण्विक दहशतीच्या छायेतून जगाची मुक्तता करण्याच्या उद्दिष्टाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढाकार घेत २०१६ मध्ये आण्विक सुरक्षा परिषदेचे आयोजन केले होते. मात्र त्यासाठीच्या नियोजनाच्या बैठकीस रशिया अनुपस्थित राहिल्यामुळे ओबामा यांच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. युक्रेनमधील रशियाच्या हालचालींबाबत अमेरिकेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल नाराजी म्हणून ही अनुपस्थिती होती की २०१६ मधील या परिषदेवरच बहिष्कार घालण्याचा रशियाचा मानस आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी संदिग्ध प्रतिक्रिया या असहभागावर भाष्य करताना युरोपीय अधिकाऱ्यांनी दिली.
सन २०१६ मधील वसंत ऋतूमध्ये ‘आण्विक सुरक्षा परिषद’ होणार आहे. या परिषदेपूर्वी केवळ तीन ते चारच नियोजन बैठका होणार आहेत. त्यातच रशिया हा जगातील पाच औपचारिक अण्वस्त्रसिद्ध देशांपैकी एक देश आहे. त्यामुळेच रशियाची अशा बैठकीस असलेली अनुपस्थिती ‘चिंताजनक’ असल्याचे म्हटले जात आहे.
जगातील दहशतवाद्यांचे थैमान वाढू लागले असतानाच त्यांच्या हातात अण्वस्त्रे पडू नयेत, या भूमिकेतून २०१० पासून अशा परिषदांची मालिका अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुरू केली. त्यानंतर अण्वस्त्रनिर्मिती क्षमता राखणाऱ्या देशांची संख्या ३९ वरून २५ पर्यंत खाली आली. २०१६ मध्ये हेग येथे ‘आण्विक सुरक्षा परिषद’ होणार आहे. या परिषदेत ३५ देशांचा सहभाग अपेक्षित आहे. या सुरक्षा परिषदेत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे राष्ट्रीय कायद्यात रूपांतर करण्याची हमी या राष्ट्रांकडून देण्यात यावी, तसेच या देशांनी आपले आण्विक कार्यक्रम स्वतंत्र निरीक्षकांतर्फे तपासणीसाठी खुले करावेत, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader