गेल्या वर्षभरापासून रशिया व युक्रेन युद्धाच्या झळा या दोन्ही देशांमधल्या सामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अजूनही या युद्धाचा अधिकृतरीत्या शेवट झालेला नसून यात दोन्ही बाजूंच्या सैन्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर जी २० परिषदेमध्ये सर्व सहभागी राष्ट्रांकडून स्वीकारण्यात आलेल्या दिल्ली कराराची जगभरात चर्चा चालू आहे. यामध्ये रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रशियानंही करार स्वीकारल्यामुळे हे मोठं यश मानलं जात आहे. त्यातच आता खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्लादिमिर पुतीन यांनी ऐन वेळी जी-२० परिषदेला येणं टाळलं होतं. त्यांच्याऐवजी रशियाचे पंतप्रधान परिषदेला उपस्थित राहिले होते. त्यामुळे युक्रेन युद्धासंदर्भात जी-२० परिषदेतील संभाव्य चर्चा टाळण्यासाठीच पुतीन अनुपस्थित राहिल्याचं तेव्हा बोललं गेलं. मात्र, रशियानंही दिल्ली करारावर स्वाक्षरी केल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आता मोदींच्या नेतृत्वाखाली भारत योग्य दिशेनं विकास करत असल्याचं कौतुक पुतीन यांनी केलं आहे.

काय म्हणाले व्लादिमिर पुतीन?

आठव्या इस्टर्न इकोनॉमिक फोरमच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पुतीन यांनी भारतासंदर्भात व पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ रशियातील आरटी न्यूजनं अपलोड केला असून त्याच्या हवाल्याने इंडिया टुडेनं सविस्तर वृत्त दिलं आहे.

केविन मॅकार्थी यांची सभापती पदावरून गच्छंती; अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षात गोंधळाची अवस्था

“आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खूप चांगले राजकीय संबंध आहेत. ते फार ज्ञानी व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाच्या नवनवीन पायऱ्या चढत आहे. यामुळे भारत व रशियाच्या हितसंबंधांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे”, असं पुतीन म्हणाले आहेत.

‘मेक इन इंडिया’चंही कौतुक

दरम्यान, याआधीही पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. २०१४ साली मोदी सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया मोहिमेची दखल घेत त्याचं पुतीन यांनी कौतुक केलं होतं. “आमच्याकडे त्यावेळी रशियात तयार होणाऱ्या कार्स नव्हत्या. पण आता आहेत. मला वाटतं आपण भारतासारख्या आपल्या मित्रराष्ट्रांचं या बाबतीत अनुकरण करायला हवं”, असं पुतीन म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia president vladimir putin praised prime minister narendra modi pmw