हजारो किलोमीटर अंतरावरील पृथ्वीवर अमेरिका आणि रशिया या दोन देशांचे युक्रेनच्या प्रश्नावरील वादामुळे वैर आहे, परंतु अंतराळात मात्र रशियन आणि अमेरिकी अंतराळवीर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
युक्रेनबाबतच्या वादामुळे अमेरिका आणि रशियाचे संबंध चांगलेच तणावाचे झाले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन- आयएसएस) हे या दोन देशांमधील सहकार्याचे दुर्मिळ उदाहरण असून त्यावर या मुद्याचा काही परिणाम झालेला नाही. अंतराळातील सहकार्य कायम ठेवून, यापुढील संयुक्त मोहीम शुक्रवारी कझाकस्तान येथून सुरू होणार आहे.
शुक्रवारी सोडल्या जाणाऱ्या अंतराळयानात अमेरिकेचा स्कॉट केली व रशियाचा मिखाईल कोर्निएन्को हे दोन अंतराळवीर आहेत. हे दोघे वैश्विक स्थानकात एरवीच्या सहा महिन्यांऐवजी एक वर्ष घालवणारे पहिलेच अंतराळवीर ठरतील. आमच्या आवडीचे काम आम्ही करतो आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. राजकीय नेत्यांना जे काय करायचे आहे, ते त्यांचे काम आहे, असे रशियन अंतराळवीर अलेक्झांडर सामोकुत्याएव याने यावर्षी पृथ्वीवर परतल्यानंतर आयएसएसवरील जीवनाबद्दल पत्रकारांशी बोलताना सांगितले.अमेरिका व रशिया या दोन देशांमध्ये अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेचे शीतयुद्ध होते. मात्र १९९८ साली आंतरराष्ट्रीय प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आलेले हे अंतराळ स्थानक हे या शीतयुद्धातून उगम पावलेल्या सहकार्याचे प्रतीक ठरले. संशोधन कार्य सुरू असलेले हे स्थानक तांत्रिकदृष्टया रशियन व अमेरिकन अशा विभागात विभागले गेले हे खरे असले, तरी कुठलाही एक देश स्वत:च्या बळावर ते चालवू शकत नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि रशिया यांना या क्षेत्रात एकमेकांची गरज आहे, असे ‘नासा’च्या सल्लागार परिषदेचे सदस्य आणि अमेरिकी तज्ज्ञ जॉन लॉग्स्डन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.अमेरिकेने स्पेस शटल अंतराळात पाठवण्याचे थांबवल्यानंतर हा देश अंतराळवीर तसेच महत्त्वाची सामुग्री अंतराळ स्थानकांपर्यंत वाहून नेण्यासाठी रशियाच्या रॉकेट्सवर अवलंबून आहे. विशेषत: गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एका व्यावसायिक रॉकेटचा स्फोट झाल्यामुळे ‘नासा’च्या खाजगी कंपन्यांचा वापर करण्याबाबत प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा