मॉस्को : मॉस्को : रशिया ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत आधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी बुधवारी सांगितले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेते बोलताना लाव्हरोव्ह यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली. रशिया आणि भारत यांच्यात आधुनिक शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासह लष्करी-तांत्रिक सहकार्याहद्दल चर्चा करण्यात आली, असे रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर ‘भारत-रशिया संबंधांथ भू-राजकीय वास्तव, धोरणात्मक साधर्म्य आणि परस्परांच्या लाभ प्रतिबिंबित होतो,’ असे मत जयशंकर यांनी व्यक्त केले. रशियाची राजधानी मॉस्को येथे सेर्गेई लावरोव्ह यांची भेट घेऊन जयशंकर यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर तपशीलवार दीर्घ चर्चा केली. जयशंकर सध्या रशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 

हेही वाचा >>> अभिनेत्री जया प्रदा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं दिल्ली, मुंबईत दाखल, न्यायालयाचे कडक निर्देश, प्रकरण गंभीर

उभय नेत्यांनी हिंद-प्रशांत महासागरीय प्रदेशातील प्रश्न, युक्रेन संघर्ष, गाझा संघर्षांची ताजी परिस्थिती, अफगाणिस्तान आणि मध्य अशिया, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रांसंदर्भात आपली मते मांडली.  या भेटीनंतर जयशंकर यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांच्याशी विस्तृत आणि सर्वार्थाने उपयुक्त चर्चा झाली. भारत-रशिया धोरणात्मक भागीदार असून, या नात्याने आम्ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती व समकालीन समस्यांवर चर्चा केली. तसेच उभय देशांतील द्विपक्षीय आर्थिक सहकार्यातील प्रगती, ऊर्जा-इंधन व्यापार, संपर्कव्यवस्था प्रभावी करण्याचे प्रयत्न करणे, लष्करी-तंत्रज्ञान सहकार्य, दोन्ही देशांच्या नागरिकांतील सहकार्याचे-सौहार्दाचे संबंध आदी मुद्दय़ांवर चर्चेत भर दिला. रशिया आमचा महत्त्वाचा साथीदार देश आहे. काळाच्या निकषावर आमची मैत्रीचे दृढ संबंध कायम राहिले आहेत. या संबंधांचा भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांना मोठा लाभ झाला आहे. जयशंकर यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात सातत्याने संपर्क असतो. उभय राष्ट्रांतील संबंध अतिशय मजबूत व स्थिर आहेत. ही आमची सातवी बैठक आहे.

यूएनएसीच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा

मॉस्को : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या (यूएनएसी) कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या भारताच्या आकांक्षेला रशियाने बुधवारी पाठिंबा दिला. तसेच जी-२० शिखर बैठकीत वादग्रस्त मुद्दय़ांची भारताने कुशलतेने हाताळणी केल्याबद्दल प्रशंसाही केली. सुरक्षा परिषदेत ब्रिटन, चीन, रशिया, अमेरिका आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी सदस्य आहेत. भारत दीर्घ काळापासून स्थायी सदस्यत्वाची मागणी करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ready to launch production of modern weapons under make in india zws