वस्तूंच्या बदल्यात तेलाच्या व्यवहारासंबंधी इराणशी करार करण्याविरोधात अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला रशियाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही धूप घालीत नाही, असे रशियाच्या वरिष्ठ मुत्सद्दय़ाने येथे स्पष्ट केले.
रशिया आणि इराण यांच्यातील व्यापारविषयक साहचर्य वाढीस लागले असून, त्यामुळे आर्थिक अथवा राजकीय स्तरावरील आव्हान देण्यात आले आहे, असे कोणाला वाटू नये, असे रशियाच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री सेर्जी रिबकोव्ह यांनी नमूद केले. इराणकडून प्रतिदिनी पाच लाख बॅरेल तेल खरेदी करण्याची रशियाची योजना आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या अंतरिम करारानुसार चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि तुर्कस्तान या देशांना दररोज दहा लाख बॅरेल तेलविक्री करण्याची मुभा इराणला देण्यात आली आहे. रशियाला सध्या इराणकडून तेलविक्री केली जात नाही.
वस्तूंच्या बदल्यात तेलाच्या व्यवहारावर रशिया आणि इराणने शिक्कामोर्तब केल्यास या दोन्ही देशांवर बंधने लादण्यात येतील, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी मंगळवारी दिला होता. त्यावर बोलताना सेर्जी रिबकोव्ह यांनी इराणसमवेत नित्याच्या सहकार्याच्या वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले. इराणसमवेत संबंध विकसित करण्याची इच्छा असल्याचे सांगत, बंधने लागू करण्याच्या अमेरिकेच्या धमकीला आपण धूप घालीत नाही, असेही रिबकोव्ह यांनी ठणकावून सांगितले.