पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे आता जागतिक पातळीवरही प्रतिसाद उमटू लागले आहे. रशियाने नोटाबंदीवरुन भारताकडे निषेध नोंदवला आहे. भारतातील रशियन दुतावासात काम करणारे कर्मचारी आणि अधिका-यांना नोटाबंदीचा फटका बसत असून तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा नाईलाजाने मॉस्कोमधील भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजवण्यात येईल असा इशाराच रशियाने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशियाचे उच्चायुक्त अलेक्झांडर कडाकीन यांनी भारतातील दुतावासात काम करणा-या रशियन कर्मचा-यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयातील दैनंदीन कामकाजासाठी पुरेसे पैसे काढू शकत नाही. त्यामुळे आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेच याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तराची वाट बघत आहोत. या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे. अन्यथा आम्हाला अन्य पर्यायांचा वापर करावा लागेल आणि यात मॉस्कोमधील भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावण्याचा विचारही केला जाईल’ अशी माहिती रशियन दुतावासातील वरिष्ठ अधिका-यांना दिली. आम्हाला बाहेरुन जेवण मागवतानाही अडचणींचा सामना करावा लागतो अशी प्रतिक्रिया एका अधिका-याने दिली.

समन्य बजावण्यासोबतच रशियाने आणखी कठोर भूमिका घेण्याचा इशाराही दिला आहे. रशियातील भारतीय दुतावासातील अधिका-यांच्या पैसे काढवण्यावर निर्बंध आणू असेही एका अधिका-यांने सांगितले. भारतात रशियाचे सुमारे २०० कर्मचारी कार्यरत आहेत. भारताने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

रशियासोबतच युक्रेन, कझाकस्तान या देशांनीही नोटाबंदीच्या निर्णयावरुन भारताकडे निषेध नोंदवला आहे. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. पाचशे आणि हजारच्या नोटा बाद झाल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे राजनैतिक अधिका-यांनाही याचा फटका बसू लागल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही नोटाबंदीवरुन नाराजी व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia says diplomats facing cash crunch threatens similar curbs