रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन आज आठवडा झाला आहे. मागील सात दिवसांपासून रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक धोरण स्वीकारत मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत. दरम्यान मंगळवारी रशियाचा मित्र देश असणाऱ्या चीनने रशियाची पुन्हा एकदा बाजू घेतलीय. रशियाने त्यांच्या सुरक्षेसंदर्भात व्यक्त केलेली चिंता योग्य असून त्याचा विचार करायला हवा, ते गांभीर्याने घ्यायला हवं, असं चीनने म्हटलंय. युक्रेन वाद सोडवण्यासाठी हा राजकीय वाद योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचंही चीनने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Ukraine War: युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भारतीय दूतावासातील…”
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार चीनने रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या निर्णयाचा विरोध केलेला नाही. युक्रेनची राजधानी किव्हवर रशियन सैन्याकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने हल्ले सुरु असतानाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी रशियाची बाजू घेतलीय. मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी, “दोन्ही बाजूंचा विचार करुन राजकीय तडजोड करणे आवशक्य आहे. युरोपच्या सुरक्षेसंदर्भातील चिंतेवरील उत्तर म्हणून तसेच युरोपमधील शांतता, सुरक्षा टीकून राहण्यासाठी हे करणं गरजेचं आहे,” असं म्हटलंय. रशियाच्या मागण्यांचा विचार व्हायलाच हवा, असंही चीनने रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या युद्धखोरीच्या निर्णयाची पाठराखण करताना म्हटलंय.
नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा
“एका देशाच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या देशाची सुरक्षा धोक्यात येता कामा नये अशी चीनची भूमिका आहे. दोन देशांमधील सुरक्षा ही लष्करी हलचालींसंदर्भातील सलोख्याने सोडवतात येतात,” असं पुढे बोलताना वँग यांनी सांगितलं. शीतयुद्धकालीन विचारसणी बदलण्याची गरज असल्याचंही वँग यांनी म्हटलं आहे. “शीतयुद्धकालीन विचार पूर्णपणे हद्दपार केले पाहिजेत. सर्व देशांचे सुरक्षासंदर्भातील योग्य चिंतांवर विचार करणे गरजेचे आहे. नाटोने पूर्वेकडे सलग पाचवेळा आपला विस्तार केलाय. त्यामुळेच रशियाला सुरक्षेसंदर्भात वाटणाऱ्या चिंतेबद्दल गांभीर्याने विचार व्हायला हवा,” असं वँग यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> Ukraine War: “ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन नाव न घेता पटोलेंचा मोदींना टोला
चीनने मंगळवारपासून युक्रेनमधील आपल्या सहा हजार विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम सुरु केलीय. “सध्या युक्रेनमधील चिनी नागरिक शेजारच्या देशांमध्ये जण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं वँग यांनी सांगितलं. युक्रेनमधील एक हजार चिनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय असंही ते म्हणाले. युक्रेनच्या शेजारील मोल्डोव्हा, स्लोव्हिया, रोमानिया आणि पोलंडमधील दूतावासाच्या माध्यमातून मदतकार्य सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.