युक्रेनचा भाग असलेल्या क्रायमियाचा प्रदेशाचा ताबा घेतल्याबद्दल रशियाला जी-८ देशांच्या गटातून निलंबित करण्यात आले आहे.  जी-८ हा आर्थिकदृष्टय़ा प्रगत देशांचा गट आहे. युक्रेनमधील कारवाया अशाच सुरू राहिल्या, तर रशियावर आणखी कडक र्निबध लादण्यात येतील असे सांगण्यात आले.जी-७ गटांच्या नेदरलँड्समधील हेग येथे सुरू असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रशियाने जूनमध्ये सोची येथे आयोजित केलेली जी-८ देशांची शिखर बैठक अमेरिका व इतर सदस्यांनी रद्द केली असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्याचा हेतू त्यामागे आहे. हेग येथे जी-७ देशांची शिखर बैठक घेण्यात आली. त्या वेळी ब्रिटन, अमेरिा, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली व जपान या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रशियाला सोळा वर्षांपूर्वी या गटात सामील करण्यात आले होते. 

जी-८ देशांची रशियात होणारी शिखर बैठक रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून आता ही परिषद ब्रसेल्स येथे जी-७ गटाच्या स्वरूपात होणार आहे. रशिया त्याच्या कारवाया थांबवत नाही व चर्चेस पूरक वातावरण निर्माण होत नाही. तोपर्यंत जी-८ गटाच्या चर्चेत सहभागी होणार नाही, असे जी-७ देशांच्या संयुक्त जाहीरनाम्यात म्हटले आहे.
जी-७ देशांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वास पाठिंबा दिला असून तेथे राजकीय स्थिरता व सुधारणा राबवण्यास मदत करण्याचे ठरवले आहे. ओबामा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की रशियाने युक्रेनच्या क्रायमिया भागात केलेले आक्रमण बेकायदेशीर असून त्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे. तेथील सार्वमतही बेकायदेशीर होते. रशियाच्या कृत्यांचे अतिशय गंभीर परिणाम होतील. रशियाने त्यांच्या कृती अशाच सुरू ठेवल्या तर आणखी र्निबध लादले जातील. रशियाने गेल्या आठवडय़ात क्रायमियाचा ताबा घेतला. रशियाने मात्र त्यांची कृती वैध असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader