रशियानं युक्रेनवर हल्ला करून आता सहा दिवस उलटले आहेत. जगभरातल्या देशांनी वारंवार आवाहनं करून देखील आणि निर्बंध टाकून देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन युद्धात माघार घ्यायला किंवा युद्ध थांबवायला तयार नाहीत. त्यामुळे आता हे युद्ध अटीतटीचं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्र राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला मदत देऊ केली आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केलं. त्यांनी दिलेल्या भावनिक भाषणानंतर युरोपियन संसदेतल्या सर्व सदस्यांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं. भाषण संपल्यानंतर तब्बल मिनिटभर टाळ्या थांबल्याच नाहीत!
रशियानं आपलं सैन्य मोठ्या प्रमाणावर युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेनं वळवलं आहे. किव्हमधल्या अनेक ठिकाणांवर रशियाकडून रॉकेट्सने देखील हल्ले करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत असून रशियाला आवर घालण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
“आम्हाला कुणीही तोडू शकत नाही”
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी यावेळी आवेशपूर्ण भाषण केलं. या भाषणानं युरोपियन संसदेतल्या सगळ्यांनाच प्रभावित केलं होतं. “आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आमची सर्व शहरं बंद झाली आहेत. पण तरी देखील कुणीही आम्हाला तोडू शकत नाही. आम्ही मजबूत आहोत. आम्ही युक्रेनचे नागरिक आहोत. आमच्या मुलांना जिवंत ठेवण्याची आमची इच्छा आहे. माझ्या मते ही अगदीच रास्त इच्छा आहे”, असं झेलेन्स्की म्हणाले.
पुतीन यांच्यावर डागली तोफ
यावेळी बोलताना झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर कठोर शब्दांत निशाणा साधला. “काल इथे १६ मुलं मारली गेली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन वारंवार हेच सांगत आहेत की ते एक प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत ज्यात फक्त लष्कराची ठाणीच टार्गेट केली जात आहेत. पण तिथे मुलं होती. ते नेमकी कोणत्या प्रकारची लष्करी कारवाई करत आहेत? कोणते टॅंक ते घेऊन जात आहेत. मिसाईल्स डागत आहेत. त्यांनी काल १६ मुलांना मारलं”, अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
“आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत…”
“आमचा निर्धार पक्का आहे. आमचं मनोधैर्य प्रचंड उंचावलेलं आहे. आम्ही लढत आहोत. आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी. आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत”, अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
युरोपला केलं मदतीचं आवाहन!
दरम्यान, यावेळी झेलेन्स्की यांनी युरोपला मदतीचं आवाहन केलं आहे. “आम्ही जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटं पडेल. आम्ही आमचं सामर्थ्य सिद्ध केलं आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केलं आहे की आम्ही देखील तुमच्यासारखेच आहोत. त्यामुळे हे सिद्ध करा की तुम्हीदेखील आमच्यासोबत आहात. हे सिद्ध करा की तुम्ही आम्हाला एकटं सोडणार नाहीत. हे सिद्ध करा की तुम्ही खरंच युरोपियन आहात. मग जीवन हे मृत्यूसमोर विजयी होईल. प्रकाशाचा अंधारावर विजय होईल”, असं झेलेन्स्की म्हणाले. “मला माफ करा मी तुम्हाला गुड डे असं म्हणू शकत नाही,” असं म्हणत वोलोडिमिर झेलेन्स्की हात उंचावून स्क्रीनसमोरुन निघून गेले.
झेलेन्स्की यांचं भाषण संपताच युरोपच्या संसदेतले सर्व सभासद उठून उभे राहिले. पुढा मिनीटभर युरोपच्या संसदेत फक्त तिथल्या सदस्यांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. शेवटी जेव्हा झेलेन्स्की यांनी स्वत:हून संसदेचा निरोप घेतला आणि ते स्क्रीनमधून बाहेर पडले, तेव्हा कुठे हा कडकडाट कमी होत थांबला!