अॅमस्टरडॅम मार्गे क्वालालंपूरला जात असलेले मलेशियाचे एमएच-१७ हे विमान गुरुवारी रशियासमर्थक अतिरेक्यांनीच पाडले, या आरोपाचा पुनरुच्चार युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी शुक्रवारी केला असतानाच, युक्रेनच्या बक या विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचा मार्ग रडारवर आम्ही टिपला आहे, असा दावा करीत हे विमान पाडण्यामागे युक्रेनचेच हवाई दल असल्याचे रशियाने सूचित केले आहे. मलेशियाच्या हवाई वाहतूक सूत्रांनीही हे विमान रशियाच्या हवाई हद्दीत नव्हते आणि ते बक या क्षेपणास्त्राद्वारे पाडले असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अपघातावरून ऑस्ट्रेलियाने रशियावर तोफ डागली असून, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय चौकशीची गरज व्यक्त केली आहे.
हे विमान रशियासमर्थक बंडखोरांनीच पाडल्याचा दावा युक्रेन करीत आहे. दोन बंडखोरांमध्ये विमान पाडण्याबाबत जे संभाषण झाले ते काही युक्रेनी लोकांनी टेप केले आहे, असेही शुक्रवारी सांगण्यात आले.रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र म्हटले आहे की, हे विमान कोसळले त्यावेळी युक्रेन नियंत्रित विमानविरोधी बक क्षेपणास्त्र प्रणालीचा मार्ग रडारवर आम्ही टिपला आहे. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सांगितले की, विमान पाडणाऱ्यांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे. मलेशियासाठी ही दुर्दैवी घटना आहे. हे विमान मुद्दाम पाडले की चुकून पाडले गेले हे समजू शकलेले नाही. मलेशियन हवाई सेवेच्या सूत्रांनी सांगितले की, विमानाने रशियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. बहुदा ते बक या विमानविरोधी यंत्रणेने पाडले असावे.
विमान अपघातात नेदरलँड्च्या १७३ प्रवासी व भारतीय वंशाच्या दोघांसह मलेशिया (४४), इंडोनेशिया (१२), इंग्लंड (९), बेल्जियम (४), फिलिपिन्स (३) या देशांचे प्रवासीही होते. कॅनडा-न्यूझीलंड, हाँगकाँग या देशांचा प्रत्येकी एक प्रवासी होता. १८ प्रवाशांच्या राष्ट्रीयत्वाबाबत अजून काही समजलेले नाही.
ओबामांशी चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मलेशियाचे पंतप्रधान व युक्रेनचे अध्यक्ष यांना दूरध्वनी करून विमान अपघातावर चर्चा केली. या अपघाताची विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची गरज अमेरिकेने तसेच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी व्यक्त केली आहे.
रशियावर टीका
हा विमान अपघात नसून विमान पाडल्याचा गंभीर गुन्हा आहे. विमान कोसळताच त्याचे खापर युक्रेनवर फोडण्याची रशियाची कृतीही बेजबाबदार आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी शुक्रवारी केली. हे विमान पाडले गेले आणि युक्रेनमधील रशियासमर्थक बंडखोरांच्याच प्रांतात ते पडले आहे आणि त्यांनीच ते पाडले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
एड्स चळवळीला फटका
ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे रविवारपासून सुरू होत असलेल्या २०व्या आंतरराष्ट्रीय एड्स परिषदेसाठी या विमानातून आघाडीचे १०० संशोधक व कार्यकर्ते प्रवास करीत होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ग्लेन थॉमस तसेच आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटीचे माजी अध्यक्ष व नेदरलँड्सचे एड्स संशोधक जोप लँग हेदेखील याच विमानात होते. या १०० संशोधकांच्या मृत्यूमुळे एड्सविरोधी चळवळीला मोठा फटका बसला आहे.
भारतीय विमान २५ किलोमीटरवर
रशियन अतिरेक्यांनी मलेशियाचे विमान पाडले, त्यावेळी या विमानापासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर एअर इंडियाचे एक विमान होते. मात्र ही दुर्घटना झाल्यानंतर या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. भारतीय परराष्ट्र विभागाने मलेशियन एअरलाइन्सशी संपर्कात साधला असून, या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला.
विमानाचा मार्ग योग्य – मलेशियाचा दावा
हे विमान आपल्या नियोजित मार्गावरूनच जात होते आणि विमानातील कार्यप्रणाली उत्तमपणे कार्यरत होती, असा दावा मलेशियाच्या मंत्र्यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेने आखून दिलेल्या मार्गावरूनच विमान जात होते आणि तो मार्ग प्रतिबंधित नव्हता, असे मलेशियाचे परिवहनमंत्री तिआँग लाई यांनी सांगितले.
कामाची वेळ बदलणे जिवावर बेतले
भारतीय वंशाचा कर्मचारी संजिदसिंग संधू याने सहकाऱ्यासमवेत कामाची वेळ बदलून घेतली आणि तो एमएच-१७ या विमानात सेवेसाठी गेला आणि तेच विमान पाडण्यात आल्याने संधू याचा दुर्दैवी अंत झाला, अशी माहिती हाती आली आहे.संधू याच्या आईने त्याच्या आवडीचा पदार्थ बनविण्याचे ठरविले होते, संधू याचे त्याबाबत आईशी बोलणेही झाले होते, मात्र सूनबाईंकडूनच ही दुर्दैवी बातमी आम्हाला समजली, असे संधूचे वडील जिजारसिंग यांनी सांगितले.