रशिया युक्रेन संकटादरम्यान रोमानियामधून भारतीय विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची रोमानियाच्या महापौरांशी बाचाबाची झाली. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. काँग्रेसने याबाबत शिंदे विद्यार्थ्यांना वाचवण्याचे श्रेय घेत होते, ज्याला रोमानियाच्या महापौरांनी विरोध केला होता, असे म्हटले होते. पण प्रत्यक्षात या दोघांमध्ये काय घडलं होतं, याचं कारण समोर आलं आहे.
रोमानियातील स्नेगोव्ह शहराचे महापौर मिहे एंगेल यांनी शिंदे यांच्याशी झालेल्या संभाषणाबाबत माहिती दिली आहे. द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत महापौर म्हणाले की, मला कोणताही राजकीय वाद नको होता. मला फक्त भारतीय विद्यार्थ्यांची काळजी होती. जे युद्धग्रस्त भागातून कसेबसे बाहेर पडले होते आणि ते भारतात कधी आणि कसे पोहोचतील हे जाणून घ्यायचे होते. महापौरांच्या म्हणण्यानुसार, शिंदे कॅमेरे वगैरे घेऊन संध्याकाळी उशिरा तेथे पोहोचले होते. ते भाषण द्यायला आलेले दिसत होते. तर त्यांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांचे सांत्वन करायला हवे होते.
“आम्ही मुलांना जेवण दिले, तुम्ही नाही”; रोमानियाच्या महापौरांनी ज्योतिरादित्य शिंदेंना सुनावले
हे विद्यार्थी २७ फेब्रुवारीला सिरेत सीमा ओलांडून येथे आले होते. स्नेगोव्ह येथील एका गावातील व्यायामशाळेत त्यांना आश्रय देण्यात आला. स्थानिक दूतावासाशी संलग्न भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की बस दुसऱ्या दिवशी पोहोचतील, असे महापौरांनी म्हटले. महापौरांच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा शिंदे तेथे पोहोचले तेव्हा मला आशा होती की त्रासलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मात्र शिंदे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना ते येथून कधी बाहेर पडतील हे सांगितले नाही. त्यांनी भारतासाठी फ्लाइट कधी आहे याबाबत माहिती दिली नाही. उलट काही कुत्र्यांना तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे ते सांगत होते. विद्यार्थी त्यांच्या घरी कधी पोहोचतील, हे त्यांना सविस्तर सांगायला हवे. ते त्यांनी न सांगितल्यामुळेच माझी नाराजी होती.”
मंत्री असल्याचे मला माहीत नव्हते
त्या मुलांची मला चिंता असल्याने मला राग आल्याचे महापौरांनी सांगितले. “मी त्या मुलांच्या वेदना पाहिल्या आहेत आणि त्याचा वापर कोणत्याही प्रसिद्धीसाच्या शूटसाठी होऊ नये अशी माझी इच्छा होती. शिंदे हे मंत्री आहेत हे मला माहीत नव्हते. हे मला कळले असते तरी मला तितकाच राग आला असता,” असे महापौरांनी म्हटले. मात्र, नंतर महापौर आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आणि दोघांनी हस्तांदोलनही केले.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला गेलेले मोदी मंत्रिमंडळातील नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये, रोमानियाच्या महापौरांनी मंत्री शिंदे यांना अडवत आठवण करून दिली की या भारतीय विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही केली होती, तुम्ही नाही. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी मदतीसाठी रोमानियन अधिकाऱ्यांचे आभार असे म्हणत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
जेव्हा शिंदे आपल्या सरकारचे कौतुक करत होते तेव्हा रोमानियाचे महापौरांनी त्यांना अडवले आणि आठवण करून दिली की, या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही केली आहे, तुमच्या सरकारने नाही. रोमानियाच्या महापौरांनी तुम्ही फक्त तुमच्याबद्दल बोला असे शिंदे यांना म्हटले. यावर ज्योतिरादित्य शिंदे थोडे अस्वस्थ असल्याचे व्हिडिओत दिसले आणि एका प्रकारे नाराज होऊन मी काय बोलणार ते मी ठरवेन असे म्हणाले होते.