रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दिवसेंदिवस तो वाढत असल्याचं दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील दोन बंडखोर प्रातांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली असल्याने या तणावात भर पडली असून युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. दरम्यान वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यास मोठ्या प्रमाणात रक्तपात होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
रशियाचा मोठा निर्णय! युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता; युद्धाचे ढग अजून गडद
विश्लेषण : रशियन बंडखोर का ठरू लागलेत युक्रेनसाठी डोकेदुखी?
जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर मोठ्या प्रमाणात रक्तपात होण्याची भीती आहे. अमेरिकेचा दावा आहे की, रशियाने हिट लिस्ट तयार केली आहे. त्यांच्या निशाण्यावर टीकाकार, मॉस्को विरोधक तसंच युक्रेनधील कमकुवत भाग आहे. रशियाचं लष्कर या सर्वांची हत्या करु शकतं. रशियाने मात्र हे वृत्त फेटाळलं आहे.
अमेरिकेने पत्र लिहून व्यक्त केली शंका
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या राजदूत बाथशेबा नेल क्रोकर यांनी संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बाचेलेट यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात रशियाचा मोठ्या हत्या कऱण्याचा कट असल्याचा उल्लेख आहे.
यादी तयार
पत्रात लिहिल्याप्रमाणे, “आमच्याकडे असणाऱ्या विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, रशियाच्या लष्कराने हिट लिस्ट तयार केली आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर या यादीत नावं असणाऱ्या काहींची हत्या केली जाणार असून इतरांनी ताब्यात ठेवलं जाणार आहे”. रशियाचा विरोध करणारे सर्व रशियाच्या निशाण्यावर असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. यामध्ये युक्रेनमध्ये राहत असलेले पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, अल्पसंख्यांक आणि LGBTQI+ सदस्य आहेत.
युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांना अपयश
एकीकडे युद्ध टाळण्याचे प्रयत्न सुरु असताना पुतीन यांनी युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्राचा दर्जा दिल्याने तणाव आणखीनच वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली असून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून युद्ध टाळण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांनाही अपयश आलं आहे.