Russia Ukraine Crisis Live Today, 02 March: युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली असताना खार्कीव्ह शहरात मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकट अधोरेखित झाले असून, देशापुढे वेगवान मदतकार्याचे आव्हान उभे ठाकले आह़े.


युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत. युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे.

Live Updates

Ukraine Crisis Live News: युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत.

20:57 (IST) 2 Mar 2022
८०० भारतीय नागरिकांना घेऊन चार विमानं भारतात दाखल होणार

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८०० भारतीय नागरिकांसह भारतीय हवाई दलाची (IAF) चार विमाने आज रात्री १.३० ते उद्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान हिंडन एअरबेसवर उतरतील.

19:56 (IST) 2 Mar 2022
भारतीयांना घेऊन आणखी एक विमान मायदेशी परतले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान दिल्लीत पोहोचले, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

https://platform.twitter.com/widgets.js

19:47 (IST) 2 Mar 2022
आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही - प्रचीती पवार

रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे. मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप

18:49 (IST) 2 Mar 2022

भारतीय हवाई दलाचे विमान ऑपरेशन गंगामध्ये सामील झाले असून बुखारेस्ट (रोमानिया) येथून पहिले विमान आज रात्री दिल्लीला परतण्याची अपेक्षा आहे. बुडापेस्ट (हंगेरी), बुखारेस्ट (रोमानिया) आणि रझेझो (पोलंड) येथून आज आणखी उड्डाणे लवकरच होणार आहे, अशी माहिती अरिंदम बागची यांनी दिली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

18:19 (IST) 2 Mar 2022
युद्धग्रस्त किव्हमधील काही दृश्ये

युक्रेनची राजधानी किव्हमधील काही दृश्ये

https://platform.twitter.com/widgets.js

17:47 (IST) 2 Mar 2022
युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलंय. हा विद्यार्थी पंजाबचा होता. त्याला पक्षाघाताचा झटका आला आणि तो बराच काळ रुग्णालयात होता, अशी माहिती समोर आली आहे.

17:36 (IST) 2 Mar 2022
भारतीय नागरिकांनी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खार्किव्ह सोडावं

भारताने खार्किव्हमध्ये अडकलेल्या नागरिकांना युक्रेनच्या वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहर सोडण्यास सांगितलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

17:16 (IST) 2 Mar 2022
रशियावरील आर्थिक निर्बंधांमध्ये सहभागी होणार नाही, चीनने स्पष्ट केली भूमिका

रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात चीन युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन सरकारमध्ये सामील होणार नाही, असे चीनच्या बँक नियामकाने बुधवारी सांगितले. चीन हा रशियन तेल आणि गॅसचा प्रमुख खरेदीदार आहे. चीन बँकिंग आणि विमा नियामक आयोगाचे अध्यक्ष गुओ शुकिंग यांनी सांगितले की, बीजिंग अशा निर्बंधांना विरोध करते. "आम्ही अशा निर्बंधांमध्ये सामील होणार नाही, आणि आम्ही सर्व संबंधित पक्षांसोबत सामान्य आर्थिक, व्यापार आणि आर्थिक देवाणघेवाण ठेवू," असे गुओ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. "आम्ही आर्थिक निर्बंधांना नाकारतो, विशेषत: एकतर्फी लाँच केलेल्या आर्थिक निर्बंधांना. त्याला जास्त कायदेशीर आधार नाही आणि त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत," असं ते म्हणाले.

17:08 (IST) 2 Mar 2022

किव्हमधून सर्व भारतीयांना जवळपास बाहेर काढण्यात आले आहे. खार्किवमध्ये काही भारतीय अडकले आहेत, जेथे हवाई कारवाई आणि गोळीबार सुरू आहे. ही परिस्थिती एक-दोन दिवसांत संपणार नाही. आपण यासाठी तयार असायला हवं, असं निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

16:58 (IST) 2 Mar 2022
मी सरकारवर टीका करू इच्छित नाही- ममता बॅनर्जी

परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रकरणांवरून मी सरकारवर टीका करू इच्छित नाही. कारण विदेशातील प्रकरणांमध्ये आपण सगळे एक असतो. समन्वयाच्या अभावामुळे आणि राजकीय कारणांनी आपण परराष्ट्र खात्याअंतर्गत येणाऱ्या बाबींमध्ये आपण मागे पडतो आहोत आणि त्यामुळे आपले विद्यार्थी तिथेच अडकले आहेत, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

https://platform.twitter.com/widgets.js

16:11 (IST) 2 Mar 2022
रशियन सैन्य किव्हजवळ पोहोचतंय- महापौर

रशिया किव्हजवळ सैन्य गोळा करत आहे, असं युक्रेनच्या राजधानीचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी बुधवारी एका ऑनलाइन पोस्टमध्ये म्हटलंय. "आम्ही किव्हच्या रक्षणाची तयारी करत आहोत !", असं ते म्हणाले.

15:54 (IST) 2 Mar 2022
रशिया युक्रेनला अण्वस्त्रे मिळू देणार नाही

रशिया युक्रेनला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही, असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी बुधवारी म्हटलं आहे.

15:39 (IST) 2 Mar 2022
रशियन शिष्टमंडळ युक्रेनशी पुन्हा चर्चा सुरू करण्यास तयार

रशियन शिष्टमंडळ बुधवारी संध्याकाळी युक्रेनियन अधिकार्‍यांशी युद्धाबद्दल पुन्हा चर्चा सुरू करण्यास तयार आहे, अशी माहिती क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

15:20 (IST) 2 Mar 2022
विद्यार्थ्याचा मृतदेह आणताना अडचणी येत आहेत - राजनाथ सिंह

युक्रेनमधील परिस्थिती पाहता, तेथे हवाई पट्टी नसल्यानं विमान उतरू शकत नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेल्या कर्नाटकच्या नवीन शेखरप्पा या एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह आणताना अडचणी येत आहेत. परंतु आमचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यासंदर्भात प्रयत्न करत आहेत, असं संरक्षण मंत्री

https://platform.twitter.com/widgets.js

यांनी सांगितलं.

14:55 (IST) 2 Mar 2022
पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश

पुतिन यांच्या सहकाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे बेलारूस देशाचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांचे. रशियाकडून हल्ल्याची घोषणा होताच त्यांनी आपल्या देशाच्या सीमा पुतिन यांच्या रणगाड्यांसाठी खुल्या केल्या होत्या. याचदरम्यान बेलारूसच्या राष्ट्रपतींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्याचे प्रसारण सरकारी वृत्तवाहिनीवर करण्यात आले होते. युक्रेनवर विजय मिळवल्यानंतर रशिया आणि पुतिन यांचे पुढील लक्ष्य मोल्दोव्हा असेल, असे या व्हिडीओवरून सांगितले जात आहे. मेल ऑनलाइनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, आतापर्यंतच्या लढाईत जरी बेलारूस थेट समोर आला नव्हता. मात्र अलीकडेच युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने बेलारूस त्यांच्या देशाविरुद्धच्या युद्धात उघडपणे उतरल्याचा दावा केला आहे. बेलारूसचे ३०० रणगाडे तैनात असून त्यांची लढाऊ विमानेही आकाशात फिरत आहेत. यावरून असे दिसून येते की बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सूचित केले आहे की व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य पुढील टप्प्यात मोल्दोव्हावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पुढे वाचा.

14:47 (IST) 2 Mar 2022
संघर्षप्रवण क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर करणार - रशियन राजदूत

खार्किव, सुमी आणि युक्रेनमधील इतर संघर्ष प्रवण क्षेत्रामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या रशियन प्रदेशातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी 'मानवतावादी कॉरिडॉर' तयार करण्यासाठी वेगाने काम करत असल्याचे रशियाने बुधवारी सांगितले.एका पत्रकार परिषदेत रशियन राजदूत-नियुक्त डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर रशिया भारताच्या संपर्कात आहे आणि सुरक्षित मार्ग शक्य तितक्या लवकर तयार केला जाईल.

13:34 (IST) 2 Mar 2022
राहुल गांधीनी मागितली ३ प्रश्नांची उत्तरं; म्हणाले,...

राहुल गांधींनी युक्रेन-रशिया युद्धादरम्यान भारत सरकारने काही गोष्टी स्पष्ट करायला हव्या अशी मागणी केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, "पुढच्या दुःखद घटना टाळण्यासाठी भारताने खालील तीन गोष्टींची माहिती द्यायला हवी

१. किती विद्यार्थ्यांना वाचवण्यात आलं?

२. सध्या किती विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत?

३. प्रत्येक भागात बचावकार्याचं सविस्तर नियोजन

या नागरिकांच्या परिवारांच्या संपर्कात राहणं आणि रणनीती स्पष्ट करणं ही आपली जबाबदारी आहे".

13:27 (IST) 2 Mar 2022
हे बॉम्बहल्ले थांबवा...; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची रशियाला विनंती

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले की, युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा सुरू होण्यापूर्वी रशियाने युक्रेनियन शहरांवर बॉम्बफेक करणे थांबवले पाहिजे, कारण या आठवड्यात वाटाघाटींच्या पहिल्या फेरीत फारशी प्रगती झाली नाही. झेलेन्स्की यांनी नाटो सदस्यांना रशियन हवाई दलाला रोखण्यासाठी नो फ्लाय झोन लागू करण्याचे आवाहन केले, ते म्हणाले की हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, इतर कोणाला रशियासोबतच्या युद्धात ओढण्यासाठी नाही.

12:42 (IST) 2 Mar 2022
पुतिन हे हुकूमशहा; बायडन यांचा हल्लाबोल

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचा उल्लेख हुकूमशहा असा केलाय. राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच स्टेट ऑफ युनियन अ‍ॅड्रेसच्या भाषणामध्ये बायडेन यांनी पुतिन यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय. पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन आज सात दिवस उलटले असून त्यानंतरही युद्ध सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांच्यावर टीका केलीय. अमेरिका युक्रेनच्या प्रत्येक इंच जमीनीचं संरक्षण करेल असं आश्वसही बायडेन यांनी दिलंय. बायडेन यांच्या या पहिल्याच स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेसच्यावेळी युक्रेनचे राजदूतही उपस्थित होते. बायडन यांनी, “अमेरिकन लष्कर रशियन लष्कराविरोधात थेट लढणार नाही, मात्र त्याचवेळी ते रशियाला मनमानी कारभारही करु देणार नाही,” असं स्पष्टच सांगितलं आहे. अमेरिका रशियावर आर्थिक निर्बंध लादणार आहे. आपल्याला रशियाच्या खोटारडेपणाचा सामना आपल्या सत्याच्या आधारे करायचा आहे, असंही बायडेन यांनी म्हटलंय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

12:34 (IST) 2 Mar 2022
“मुघलांनी राजपूतांचं केलं तसं शिरकाण रशिया आमचं करतंय”- युक्रेनचे राजदूत

युक्रेनमध्ये बॉम्बफेक आणि गोळीबार थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात प्रत्येक संसाधनाचा वापर करा” असे आवाहन युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ इगोर पोलिखा यांनी केलं आहे.त्याचबरोबर त्यांनी रशियन आक्रमणाची तुलना मुघलांनी राजपूतांच्या विरोधात आयोजित केलेल्या नरसंहाराशी केली. ते मंगळवारी म्हणाले, “हे राजपूतांच्या विरोधात मुघलांनी घडवलेल्या नरसंहारासारखे आहे. आम्ही मोदींसह सर्व प्रभावशाली जागतिक नेत्यांना पुतिन यांच्या विरोधात बॉम्बफेक आणि गोळीबार थांबवण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करण्यास सांगत आहोत.”

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

11:42 (IST) 2 Mar 2022
बोईंगने रशियन एअरलाइन्सचे भाग, देखभाल निलंबित केली

अमेरिकेतली विमान उत्पादक कंपनी बोईंगने सांगितले की, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक विमान वाहतूक उद्योगाला धक्का बसल्यामुळे ते रशियन एअरलाइन्सचे भाग, देखभाल आणि तांत्रिक समर्थन निलंबित करत आहेत.

11:40 (IST) 2 Mar 2022
रशियन विमानांना अमेरिकेत नो एन्ट्री

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर मॉस्कोने केलेल्या आक्रमणाचा निषेध केला आहे. हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचा आरोपही बायडन यांनी केला आहे.

11:27 (IST) 2 Mar 2022
निकोलायव्हमध्ये रॉकेट हल्ला

रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर युक्रेनच्या निकोलायव्ह भागात दाट धूर पसरला होता. मॉस्कोकडून युद्धाच्या सातव्या दिवशीही आक्रमणं होत होती. युक्रेनच्या प्रमुख शहरांवरही बॉम्बफेक करण्यात आली आणि खेरसन शहर रशियाच्या ताब्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

10:43 (IST) 2 Mar 2022
पुतिनना मोठी किंमत मोजावी लागणार - जो बायडन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर कठोर टीका केली आहे आणि स्टेट ऑफ द युनियनच्या भाषणात युक्रेनियन लोकांना पाठिंबा दर्शवला आहे. पुतिनना रणांगणावर यश मिळेलही, पण त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असा इशारा जो बायडन यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला असून “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”, अशा शब्दांत जो बायडेन यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आम्ही मजबूत आहोत. आम्ही स्वातंत्र्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तुम्ही सिद्ध करा की आम्हाला एकटं सोडणार नाही”, असं आवाहन त्यांनी युरोपियन संसदेसमोर केलं. त्यांच्या भाषणावर संसदेमध्ये स्टँडिंग ओवेशनने दाद देण्यात आली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

10:13 (IST) 2 Mar 2022
स्थानिक परिस्थितीच्या माहितीसाठी WhatsApp हेल्पलाईन

युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवांनी लोकांना स्थानिक परिस्थिती आणि सुरक्षा उपायांबद्दल माहिती आणि गंभीर बातम्या पाठवण्यासाठी WhatsApp वर एक हेल्पलाइन सुरू केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा आज सातवा दिवस आहे.

10:05 (IST) 2 Mar 2022
खार्किव्हमधल्या रुग्णालयावर रशियाचा हल्ला

प्राणघातक गोळीबाराच्या एका दिवसानंतर, रशियन हवाई सैन्याने पूर्व युक्रेनियन खार्किव्ह शहरात उतरून स्थानिक रुग्णालयावर हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने सांगितले की, "रशियन हवाई सैन्य खार्किव्हमध्ये उतरले आणि त्यांनी एका स्थानिक हॉस्पिटलवर हल्ला केला. तेथे लढाई चालू आहे."

10:02 (IST) 2 Mar 2022
युक्रेनमधलं खेरसन रशियाच्या ताब्यात?

रशियन सैन्याने दक्षिण युक्रेनमधील खेरसन या शहरावर ताबा मिळवला आहे, कारण मॉस्कोने आक्रमणाच्या ७ व्या दिवशी हल्ले केले आहेत. मात्र, स्थानिक अधिकार्‍यांकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.BNO News या आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.

09:34 (IST) 2 Mar 2022
भारतात परतल्यावर विद्यार्थ्यांचा जयघोष

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून भारतात विशेष विमानसेवेद्वारे सुखरूप पोहोचल्यानंतर विमानतळावर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय म्हणत जयघोष केला. त्यावेळी दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.

08:47 (IST) 2 Mar 2022
आम्ही खूश आहोत पण...; युद्धभूमीतून मायभूमीत परतणाऱ्या विद्यार्थ्याची मोदी सरकारकडून अपेक्षा

सरकार आम्हाला मदत करत आहे. आम्ही आनंदी आहोत पण विमानांची संख्या आणखी रोमानियामध्ये लोक अडचणीत आहेत. म्हणून तिथे भारतीय दूतावासाने आम्हाला मदत करावी. ते चांगलं होईल, अशी अपेक्षा रोमानियामधल्या बुचारेस्ट इथून परतणाऱ्या विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे.

08:37 (IST) 2 Mar 2022
पुतिन यांनी कुटुंबियांना अंडरग्राऊण्ड सिटीमध्ये पाठवलं!

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन सध्या चर्चेत आहेत. आता पुतिन यांच्या पाठोपाठ त्यांचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. रशियामधील एका प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला एका जमीनीखालील शहरामध्ये म्हणजेच अंडरग्राउण्ड सिटीमध्ये पाठवलं आहे. हे शहर अण्वस्त्र हल्ल्यापासूनही (nuclear attack) सुरक्षित असल्याचा दावा केला जातोय. प्राध्यापकाने केलेल्या दाव्यानुसार पुतिन यांनी आपल्या कुटुंबियांना सायबेरियामधील एका गुप्त ठिकाणी हलवलं आहे.

युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या बिलगोरोड शहरात भारतीय बचाव पथक तैनात करण्यात आले आहे, मात्र खार्कीव्ह आणि शेजारील शहरांतील युद्धस्थिती मदतकार्यात मोठा अडथळा ठरत आह़े खार्कीव्ह शहरात रशिया आणि युक्रेन सैन्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तेथील बिघडती परिस्थिती चिंतेची बाब असून, सर्व भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने मंगळवारी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या. कीव्ह शहरातून तातडीने बाहेर पडावे, त्यासाठी रेल्वेमार्ग किंवा अन्य उपलब्ध वाहतूक साधनाचा वापर करावा, अशी सूचना दूतावासाने भारतीयांना केली.