रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर लाखो लोक सुरक्षित स्थळांच्या शोधात शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. यामध्ये पोलंड, हंगेरी, बल्गेरिया, मोल्दोव्हा आणि रोमानियासारख्या देशांच्या नेत्यांनी युक्रेनियन नागरिकांचे स्वागत केले आहे. पण दुसरीकडे २०१५ मध्ये अशीच परिस्थिती उद्धभवलेली असताना पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतून, विशेषत: सीरियामधून स्थलांतरितांना अशी वागणूक दिली गेली नव्हती. युरोपीय नेत्यांनी या स्थलांतरितांना विरोध दर्शवला होता.
युरोपियन देशांनी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत शेकडो हजारो युक्रेनियन लोकांसाठी आपल्या सीमा उघडल्याने १० वर्षांपूर्वी शेजारच्या लेबनानमध्ये युद्धातून पलायन केलेले सीरियन निर्वासित अहमद अल-हरीरी यांनी आपल्या नशिबाला दोष दिला आहे. गेल्या एका दशकापासून अहमद अल-हरीरी हे युरोपमध्ये नवीन जीवन जगण्याच्या आशेने निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत.
बर्फामध्ये तंबूत राहण्यास भाग पाडले
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, “आम्ही आश्चर्यचकित आहोत, सर्व देशांमध्ये युक्रेनियन लोकांचे स्वागत केले जात आहे. आम्ही, सीरियन निर्वासित इतके दिवस बर्फाखाली तंबूत राहत आहोत. रोज मृत्यूला सामोरे जावे लागते, पण आमची काळजी घ्यायला कोणी तयार नाही. माझ्याप्रमाणेच जवळपास २५ कुटुंबे येथे राहत आहेत. आम्ही मृत्यूला तोंड देत आहोत आणि कोणीही आमच्याकडे पाहत नाही?” असे अहमद यांनी सांगितले.
अरब जगात, १२ दशलक्ष सीरियन लोक युद्धामुळे बेघर झाले आहेत. २०१५ मध्ये युरोपने सीरियन आणि इतर निर्वासितांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तसा प्रकार युक्रेनियन नागरिकांच्या बाबतीत होत नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. खराब हवामानात चालत निर्वासितांनी देश सोडले, समुद्र पार करताना काही लोकांचा मृत्यूही झाला. युरोपच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अनेकांना मारले गेले, परंतु याक्षणी असे काहीही घडत नाही. युक्रेनियन लोकांचे आता स्वागत होत आहे, असेही अहमद यांनी म्हटले.
रशियाने आक्रमण सुरू केल्यानंतर, युक्रेनमधून किमान चार लाख निर्वासितांनी जवळच्या राज्यांमध्ये प्रवेश केला आहे, असे युरोपियन युनियनने सांगितले आहे.
२०२१च्या सुरुवातीस, सीरियन संघर्षानंतर १० वर्षांनी, युरोपियन देशांनी १ दशलक्ष सीरियन निर्वासितांना सामावून घेतले होते. ज्यामध्ये एकट्या जर्मनीने अर्ध्याहून अधिक निर्वासित गेले होते. त्यापैकी बहुतेक २०१६ च्या कराराच्या आधी आले आहेत. युरोपियन युनियनने टर्कीला ३.७ दशलक्ष सीरियन नागरिकांना प्रवेश देण्यासाठी अब्जावधी युरो दिले आहेत. मात्र यावेळी युक्रेनियन नागरिकांचे तात्काळ स्वागत करण्यात आले आहे.
बल्गेरियाचे पंतप्रधान किरिल पेटकोव्ह यांनी युक्रेनचे लोक निर्वासित नसून युरोपियन आहेत, असे म्हटले आहे. “हे लोक हुशार, सुशिक्षित लोक आहेत, ही निर्वासितांची लाट नाही. ज्यांची ओळख आणि भूतकाळ माहित नाही ते दहशतवादी असू शकतात. युरोपमधील एकही देश सध्याच्या निर्वासितांच्या लाटेला घाबरत नाही,” असेही पेटकोव्ह म्हणाले.
गेल्या वर्षी ३,८०० सीरियन नागरिकांनी बल्गेरियामध्ये संरक्षण मागितले होते. त्यापैकी १,८५० लोकांना निर्वासित असल्याचा दर्जा देण्यात आला. सीरियन लोकांचे म्हणणे आहे की बहुतेक निर्वासित फक्त बल्गेरियामार्गे युरोपियन युनियनच्या श्रीमंत राज्यांमध्ये जातात.
मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील स्थलांतरितांच्या लाटेच्या विरोधात असणाऱ्या पोलंडच्या सरकारनेही युक्रेन युद्धातून पळून जाणाऱ्यांचे स्वागत केले आहे. मध्य पूर्व आणि आशियातून येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सीमेवर अडथळा निर्माण करणाऱ्या हंगेरीने, शेजारच्या युक्रेनमधील निर्वासितांचे समर्थन करत त्यांच्यासाठी वाहतूक, कपडे आणि अन्नाची सोय केली आहे. मध्य पूर्वेतून येणाऱ्या निर्वासितांना आमच्या सीमेवर येण्याआधीच इतर सुरक्षित देशांनी आश्रय द्यायला हवा असे हंगेरी आणि पोलंड या दोघांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही पाश्चात्य पत्रकारांनी, युक्रेनमधील मानवतावादी आपत्ती सीरिया, इराक किंवा अफगाणिस्तानमधील संकटांपेक्षा वेगळी आहे. तसेच युरोपीय लोकांचे युक्रेनमधील पीडितांशी अधिक जवळचे संबंध आहेत असे म्हटले आहे. या वक्तव्यांवरुन आता सोशल मीडियावर निषेधाची लाट उसळली आहे. तसेच पश्चिमेकडील देशांवर पक्षपाताचा आरोप केला जात आहे.
यावर अरब रिफॉर्म इनिशिएटिव्हचे कार्यकारी संचालक नदीम होरी यांनी जगाच्या इतर भागांतील निर्वासितांबद्दलचे माध्यमांचे अज्ञान समोर आले आहे असे म्हटले आहे.