वर्षभरापूर्वी अजमल रेहमानीने अफगाणिस्तान सोडलं. तो युक्रेनमध्ये येऊन स्थायिक झाला. अफगाणिस्तानमधील हिंसेला, युद्ध संघर्षाला कंटाळून युक्रेनमध्ये स्थायिक झालेल्या अजमलला त्याच्या कुटुंबियांबरोबर आता युक्रेनमधूनही स्थलांतरित व्हावं लागलंय. पोलंडमध्ये स्थलांतरित होणाऱ्या हजारो युक्रेनियन नागरिकांमध्ये अजमलचाही समावेश आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”
“मी एका युद्धामधून पळालो आणि दुसऱ्या देशात आलो. तर इथे दुसरं युद्ध सुरु झालं. फार वाईट नशीब आहे माझं,” रेहमानीने अशी प्रतिक्रिया एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलीय. पोलंडमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने ही प्रतिक्रिया दिलीय.
रेहमानीसोबत त्याची सात वर्षाची मुलगी, पत्नी मिना आणि ११ वर्षांचा मुलगा ओमर हे पोलंडमध्ये निर्वासित म्हणून आलेत. हे चौघेजण पोलंडमध्ये येण्यासाठी जवळजवळ ३० किमीचं अंतर पायी कापून आलेत. युक्रेनमध्ये सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने त्यांनी चालतच युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केलाय. युक्रेनमधून हजारो लोकांनी मागील चार दिवसांमध्ये पलायन केलं आहे. युक्रेनमधून लोक प्रामुख्याने पोलंड, हंगेरी आणि रोमानियामध्ये गेलेत.
नक्की पाहा >> Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”
युक्रेन सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकांमध्ये युक्रेनबरोबरच इतर देशांमधून आलेले विद्यार्थी, कामगारांचाही समावेश आहे. प्रामुख्याने अफगाणिस्तान, कांगो प्रजासत्ताक, भारत आणि नेपाळमधील नागरिकांचा या निर्वासितांमध्ये समावेश आहे.
४० वर्षीय रेहमानीने दिलेल्या माहितीनुसार तो यापूर्वी १८ वर्ष अफगाणिस्तानमध्ये नाटोसाठी काम करत होता. तो काबुल विमानतळावर तैनात होता. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघाल घेण्याच्या चार महिनेआधी रेहमानी त्याच्या कुटुंबियांसोबत अफगाणिस्तान सोडून युक्रेनमध्ये आला होता. सतत मिळणाऱ्या धमक्या आणि मुलांच्या आयुष्यावर परिणाम होऊ नये या दोन मुख्य कारणांमुळे तो युक्रेनमध्ये आलेला.
नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा
“यापूर्वी माझं आयुष्य अफगाणिस्तानमध्ये निवांत सुरु होतं. माझं स्वत:चं घर होतं, गाडी होती आणि पगारही चांगला होता,” असं रेहमानी सांगतो. “मी माझी गाडी, घर आणि सर्वकाही विकून इथे आलो आणि इथे ते सारं आथा गमावून बसलोय. मात्र माझे कुटुंब आणि त्यांच्या प्रेमापेक्षा काहीही महत्वाचं नाहीय,” असं रेहमानी सांगतो.
रेहमानीला अफगाणिस्तान सोडताना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्याला युक्रेन हा एकमेव पर्याय उपलब्ध होता आणि त्याने काहीही करुन अफगाणिस्तान सोडायचं ठरवून युक्रेनमध्ये आपला संसार थाटला. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या ओडसा शहरामध्ये ते स्थायिक झाले. चार दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केला तेव्हा या बंदरावरील शहरातून पोलंडच्या सीमेपर्यंतचं एक हजार १०० किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलं. पुन्हा अफगाणिस्तानप्रमाणे त्याला सर्व संपत्ती सोडून देश सोडावा लागला. मागील काही दिवसांमध्ये रेहमानीप्रमाणे दोन लाख १३ हजार नागरिकांनी युक्रेन पोलंडची सीमा ओलांडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
नक्की वाचा >> Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन
आता रेहमानी आणि त्याच्या कुटुंबाला विस्थापित म्हणून नोंदणी करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला जाणार आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलंडमध्ये स्वयंसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी आमचं स्वागत केलं ते आम्हाला ऊर्जा देणारं असून यातून मार्ग निघेल असा आशावादही रेहमानीने व्यक्त केलाय.