कीव्ह (युक्रेन) : रशियाने एकतर्फी विलिनीकरण केलेल्या खेरसन प्रांतातील नागरिकांचे रशियामध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दक्षिण आघाडीवर युक्रेन सैन्याच्या मुसंडीमुळे रशिया चिंतेत पडला असून त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

युक्रेनच्या सैन्याकडून सातत्याने हल्ले होत असल्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करावे, अशी मागणी खेरसनचे रशियाधार्जिणे नियंत्रक व्लादिमीर साल्डो यांनी केली होती. त्यानुसार रशियातील रोस्तोव्ह, क्रान्सोडर, स्टार्वोपोल आणि क्रीमियामध्ये हे स्थलांतर केले जाणार आहे. रशियाने हे स्थलांतर ऐच्छिक असल्याचे जाहीर केले असले तरी युद्धात फसलेल्या खेरसनच्या नागरिकांना केवळ रशियामध्ये जाणारेच मार्ग उपलब्ध करून दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नागरिकांना बळजबरीने वाईट स्थिती असलेल्या स्थलांतरितांच्या शिबिरांमध्ये पाठवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. याखेरीज शेकडो अनाथ आणि दत्तक कुटुबांसोबत राहणाऱ्या मुलांना रशियामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती ‘असोसिएटेड प्रेस’ने समोर आणली आहे.

राखीव सैन्यभरती दोन आठवडय़ांत- पुतिन

गेल्या महिन्यात जाहीर झालेली राखीव सैन्यभरतीची प्रक्रिया येत्या दोन आठवडय़ांत पूर्ण होईल, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केले आहे. राखीव सैनिकांची कुमक आधीच युक्रेनमध्ये आघाडीवर पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला.

कझाकस्तानमधील परिषदेला उपस्थिती लावल्यानंतर पुतिन यांनी राखीव सैन्यभरतीबाबत माहिती दिली. ३ लाख राखीव सैनिकांपैकी २ लाख २२ हजार सैनिकांची भरती झाली असून त्यापैकी ३३ हजार सैनिकांना लष्करी विभागांमध्ये पाठवण्यात आले आहे. यातील १६ हजार सैनिक हे युक्रेनमध्ये पोहोचले असल्याचे पुतिन यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये राखीव सैन्यभरती जाहीर करताना केवळ लढाई किंवा सैन्याचा पूर्वानुभव असलेल्यांनाच बोलावण्यात येईल, असे पुतिन यांनी जाहीर केले होते. मात्र याबाबत काढण्यात आलेल्या आदेशात याचा कोणताही उल्लेख नाही. वैद्यकीय कारणांमुळे सेवेस अपात्र ठरणाऱ्यांचीही भरती केली जात असल्याचे वृत्त रशियातील काही माध्यमांनी दिले आहे.

Story img Loader