रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने एकीकडे जगभरातून निषेध केला जात असताना दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्कोत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इम्रान खान दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून २३ तारखेला ते मॉस्कोत दाखल झाले. एकीकडे पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली असताना दुसरीकडे इम्रान खान यांचा दौरा असल्याने जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने मात्र हा दौरा आधीच ठरला होता असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र या दौऱ्यावरुन काँग्रेस नेते शशी थरुर यांनी संताप व्यक्त केला आहे.
“पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी करावी”; युक्रेनची भारताकडे विनंती, म्हणाले “आताच दिल्लीच परिस्थिती…”
रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता तसंच युद्धाची घोषणा केल्यानंतर तिथे दौरा करणारे इम्रान खान पहिलेच नेते ठरले आहेत. नवाज शरीफ यांनी १९९९ मध्ये केलेल्या दौऱ्यानंतर ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. रशियात पोहोचल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत असून दौऱ्याच्या वेळेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
शशी थरुर यांनी रशिया दौऱ्यावर असणाऱ्या इम्रान खान यांना खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी इम्रान खान यांना भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करुन दिली आहे. १९७९ मध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना चीनने व्हिएतनामवर हल्ला केल्यानंतर त्यांनी दौरा रद्द केला होता अशी आठवण त्यांनी इम्रान खान यांना करुन दिली असून त्यांनीही तात्काळ मायदेशी परतावं असा सल्ला दिला आहे.
“इम्रान खान यांच्यात थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर वाजपेयी साहेबांनी १९७० च्या भेटीदरम्यान चीनने व्हिएतनामवर हल्ला केला तेव्हा जे केलं तेच करतील. त्यांनी आपला दौरा त्वरित रद्द करावा आणि मायदेशी परतावं. अन्यथा तेदेखील या हल्ल्यात सहभागी आहेत,” असं शशी थरुर ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे – शशी थरुर
रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण सुरू केलं असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मॉस्कोच्या सुरक्षा चिंतेचे कितीही कौतुक केले जात असले तरी युद्धाचा अवलंब करणं किंवा समर्थन करणं अशक्य आहे. भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे असं म्हटलं आहे.