सध्याच्या तणावामुळे युक्रेन आणि रशियाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या अगोदर उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे जाहीर सभेला संबोधित करताना सिंह म्हणाले की, बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल्यास आणखी त्रास होईल, असे राजथान सिंह म्हणाले. जगातील बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. ते पुढे म्हणाले की, जर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल आणि भारत यातून सुटणार नाही.

भाजपा कधीही जनतेच्या विश्वासाला तोडत नाही आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. जौनपूरच्या मल्हानी आणि चंदौलीच्या चकिया विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रचारसभांना संबोधित करताना सिंह यांनी दावा केला की, गेल्या ३५-४० वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये एकाही पक्षाने सलग दोन वेळा सरकार स्थापन केले नाही, पण भाजपा सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन गंगाबद्दल ही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, माध्यमांना संबोधित करताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की एकूण ४८ उड्डाणे चालविली गेली आहेत आणि १०,३४८ विद्यार्थ्यांना परत आणले आहे. गेल्या २४ तासात १८ उड्डाणे चालवण्यात आल्याची माहिती बागची यांनी दिली. “पिसोचिनमध्ये ९०० ते १००० भारतीय आणि सुमीमध्ये ७०० हून अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. आम्ही तेथे काही बसेस पाठवण्यात यशस्वी झालो आहोत. पाच बस आधीच सुरू आहेत, आणि संध्याकाळी उशिरा आणखी बस चालवल्या जातील. आम्ही अधिकाऱ्यांना विशेष विनंती केली होती. युद्धविरामशिवाय विद्यार्थ्यांना बाहेर काढणे कठीण दिसत आहे. आम्ही युक्रेन आणि रशियाला युद्धविराम करण्याची विनंती करतो जेणेकरून आम्ही स्थलांतर करू शकू,” असे बागची म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war continues the world will have to pay a heavy price defense minister rajnath singh abn