Russia Ukraine Crisis Live Today, 28 Feb: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अण्वस्त्र सज्ज करण्याचे आदेश दिल्याने या दोन देशांमधला तणाव आणखी वाढला आहे.

दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पोलिश राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुढील संयुक्त पावले उचलण्यावर या दोघांनीही सहमती दर्शविली.

Live Updates

Russia Ukraine World War Live News : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे.

21:21 (IST) 28 Feb 2022
पुतीन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान पुतिन म्हणाले की, रशियाच्या सुरक्षेच्या हिताचा विचार केला तरच युक्रेनवर तोडगा शक्य आहे.

19:39 (IST) 28 Feb 2022
"बचावाच्या कामावर राजकारण नको", माजी पंतप्रधान देवेगौडा यांचं आवाहन

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले, "बचावाच्या कामावर राजकारण नको, मोहीम राबवणाऱ्यांचं मनोधैर्य कमी होईल. संकटाच्या काळातील आपली ही कृती वाईट दिसेल. एकत्रित काम करुयात."

https://twitter.com/ANI/status/1498296434780946434

17:08 (IST) 28 Feb 2022
ठाणे जिल्ह्यातील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आपत्ती निवारण कक्षातर्फे शुक्रवारी काही मदत क्रमांक जाहीर करण्यात आले होते. या मदत क्रमांकांद्वारे जिल्हयातून आतापर्यंत ५६ पालकांनी त्यांची मुलं युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. 

16:50 (IST) 28 Feb 2022
भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची पोलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा

भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची पोलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा, पोलंडच्या मदतीसाठी आभार व्यक्त, एस. जयशंकर यांचं ट्वीट

https://twitter.com/ANI/status/1498253994103549952

16:14 (IST) 28 Feb 2022
मोदी सरकारचे चार मंत्री जाणार युरोपला; भारतीयांना परत आणण्याचं टास्क

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे हजारो भारतीय नागरिक युद्धजन्य भागात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार मोदी सरकारचे चार मंत्री थेट युद्धजन्य युक्रेनच्या शेजारी युरोपीयन देशांमध्ये जाणार आहे. या सर्व मंत्र्यांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्याच्या मोहिमेत समन्वयक म्हणून नेमण्यात आलंय. यानुसार हे मंत्री भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

16:08 (IST) 28 Feb 2022
युद्ध थांबणार की आणखी पेटणार? दोन्ही देशांत चर्चेला सुरूवात

रशिया-युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान बेलारूसमध्ये चर्चेला सुरूवात झाली आहे. दोन्ही देशांतील उच्च-स्तरीय शिष्टमंडळांमध्ये दोन देशांमधील शत्रुत्व संपवण्याच्या उद्देशाने चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर युद्धाचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

16:02 (IST) 28 Feb 2022
आत्तापर्यंत १६ युक्रेनियन लहान मुलांचा बळी; ५,३०० रशियन सैनिकांचा मृत्यू

आमच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. आमच्या मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, बॉम्बस्फोट, गोळीबार आणि अशाच प्रकारच्या हल्ल्यांमध्ये १६ लहान मुलं मारली गेली असल्याची माहिती युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ इगोर पोलिखा यांनी दिली. ते पुढे म्हणाले, "काल रशियन विमानांसाठी युरोपचा हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे. रशियन अर्थव्यवस्था दिवसेंदिवस दुर्बल होत आहे. रशियामध्ये अभूतपूर्व जीवितहानी होत आहे. सुमारे ५,३०० रशियन सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

15:54 (IST) 28 Feb 2022
रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर ९.५ टक्क्यांवरून वाढवून केला तब्बल २० टक्के

युक्रेनविरुद्ध छेडलेल्या युद्धामुळे रशियामध्ये आर्थिक आणीबाणीसदृश्य परिस्थिती ओढवली असून, त्यावर तोडगा म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजाचे दर ९.५ टक्क्यांवरून वाढवून थेट २० टक्के केले आहेत. रशियाचं रुबल हे चलन ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले असून रशियानं निर्यातदार कंपन्यांना विदेशी चलन विकण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. रॉयटर्सनं या संदर्भात वृत्त दिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रविवारी लष्कराला युक्रेनविरोधात अण्वस्त्र सज्ज होण्याचे आदेश दिल्यानंतर रुबलची ऐतिहासिक घसरण होत त्याचा भाव एका डॉलरला १२० इतका घसरला. युरोप व अमेरिकेनं रशियाविरोधात आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर रशियाचं चलन आधीच घसरणीच्या मार्गावर होतं ते आणखी घसरलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

15:04 (IST) 28 Feb 2022
लष्करी अनुभव असलेल्या आणि जे रशियाविरुद्ध लढू इच्छिता अशा कैद्यांना मुक्त करणार - झेलेन्स्की

रशियाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या आणि ज्यांना लष्करी अनुभव आहे अशा कैद्यांची सुटका केली जाणार आहे. अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे.

15:00 (IST) 28 Feb 2022
युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी RTPCR टेस्टची आवश्यकता नाही

आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवास अ्ॅडव्हायझरीमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार आता युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने काही वैद्यकीय बाबींमध्ये सूट दिली आहे. त्यानुसार अनिवार्य करण्यात आलेली प्री-बोर्डिंग निगेटिव्ह RTPCR चाचणी आणि लसीकरण प्रमाणपत्रासाठी युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांना सूट देण्यात आलेली आहे. शिवाय, हवाई-सुविधा पोर्टलवर प्रस्थानापूर्वी दस्तऐवज अपलोड करण्यासही सूट दिली गेली आहे.

14:14 (IST) 28 Feb 2022
रशियन फौजेचे आता आक्रमक नाही तर बचावात्मक धोरण ; युक्रेनचा दावा!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेवरील हल्ले अद्याप जरी सुरू असले तरी याची गती आता कमी झाली असल्याचा दावा, युक्रेनच्या लष्कराकडून करण्यात आला आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे की, रशियन सैन्याने आक्रमणाचा वेग कमी केला आहे. शिवाय, दोन्ही देशांमध्ये आज देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रशियाच्या आर्थिक कोंडीसाठी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवाय, आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्रेनने रशियन हल्ल्याविरोधात खटला देखील दाखल केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

13:57 (IST) 28 Feb 2022
दोन्ही देशांमध्ये काही वेळात चर्चा होणार

रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केल्याने युद्धाची सुरूवात झाली. ज्याचे परिणाम जगभरात उमटू लागले. जगभरातल्या नेत्यांनी दोन्ही देशांना सामोपचाराने आणि सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर चर्चा होणार अशी चिन्हं दिसू लागली. मात्र चर्चा बेलारूसमध्ये नको असं म्हणत युक्रेनने नकार दिला होता. मात्र आता रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची बेलारूलमध्ये चर्चा होणार आहे. युक्रेन सुरुवातीला बेलारूसला शिष्टमंडळ पाठवण्यास नाखूष होता. मात्र आता युक्रेनने शेजारच्या बेलारूसमध्ये रशियन प्रतिनिधींना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविण्याचे मान्य केले आहे. काही वेळातच या दोन देशांमधल्या चर्चेला सुरूवात होणार आहे.

13:10 (IST) 28 Feb 2022
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा पुतिन यांचा कट उधळला!

रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्क यांची हत्या करण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलेल्या चेचेन स्पेशल फोर्सचा खात्मा केला आहे. युक्रेनमध्ये घुसखोरी करुन रशियाला थेट आव्हान देणाऱ्या वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येची जबाबदारी सोपवण्यात आलेली ही विशेष तुकडी युक्रेनने संपवल्याचं वृत्त डेली मेलने दिलं आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन करत शत्रूचा खात्मा करणारी आणि हिंसक तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेचेन स्पेशल फोर्सचे ५६ टँक युक्रेनने उद्धवस्त केलेत. राजधानी किव्हजवळच्या होस्तोमीलमध्ये रशियन सैन्य आणि युक्रेनच्या लष्करामध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

13:01 (IST) 28 Feb 2022
राष्ट्रगीत गात महिलेनं सावरला उध्वस्त झालेला संसार; व्हिडीओ व्हायरल

या महिलेचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला कुसुमाग्रजांची मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ही कविता आठवल्याशिवाय राहणार नाही. असं काय आहे या व्हिडीओमध्ये? या व्हिडीओत एक युक्रेनियन महिला आपलं बॉम्बहल्ल्यामध्ये उध्वस्त झालेलं घर सावरताना दिसत आहे. घरात इतस्ततः पडलेल्या काचा ती उचलताना दिसत आहे. आणि हे करता करता ती युक्रेनचं राष्ट्रगीत गात आहे.

संपूर्ण बातमी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

12:17 (IST) 28 Feb 2022
रशियन सैन्य विरुद्ध युक्रेनचं कॉकटेल! 'ही' युक्ती वापरत सर्वसामान्य नागरिकही रणांगणार

युक्रेनमध्ये १,९६,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत, तर व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात सुमारे ९,००,००० सक्रिय लष्करी कर्मचारी आणि दोन दशलक्ष राखीव कर्मचारी आहेत. तरीसुद्धा, युक्रेनियन लोक हार मानण्यास नकार देत आहेत शस्त्रे उचलत आहेत, त्यांच्या बागांमध्ये मोलोटोव्ह कॉकटेल बनवत आहेत. हे मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे कोणता खाण्यापिण्याचा पदार्थ नसून हे पेट्रोल बॉम्ब आहेत जे तुलनेने सहज बनवता येतात. काचेची बाटली ज्यामध्ये पेट्रोल किंवा अल्कोहोलसारखे कोणतेही ज्वलनशील पदार्थ लक्ष्यावर आग लावण्यासाठी वापरले जाते ते म्हणजे मोलोटोव्ह कॉकटेल.

11:20 (IST) 28 Feb 2022
शरद पवार आणि एस जयशंकर यांच्यात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि खार्किव, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेल्गोरोड (रशिया) मार्गाने स्थलांतर परत आणण्याबाबत चर्चा केली. रोमानिया-पोलंड सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याबाबतही चर्चा झाली.

10:43 (IST) 28 Feb 2022
न्यूझीलंडनं संसदेच्या इमारतीवर युक्रेनचा झेंडा फडकवत दिला पाठिंबा

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनियन लोकांना समर्थन म्हणून वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडच्या संसदेवर युक्रेनचा ध्वज फडकवण्यात आला. केवळ पाठिंबाच नव्हे तर न्यूझीलंडने स्थानिक आरोग्य संस्थांना तसेच अन्न आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत गरजांसाठी युक्रेनला २ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

09:59 (IST) 28 Feb 2022
युद्धात सहभागी होण्यासाठी युक्रेनचं इस्रायलला आमंत्रण

इस्रायलमधील युक्रेनच्या दूतावासाने शनिवारी फेसबुकवर पोस्ट केलं की रशियन आक्रमणाशी लढण्यासाठी स्वयंप्रेरणेने युक्रेनला जाण्याची इच्छा आहे, अशांचं स्वागत आहे. या पोस्टमध्ये युक्रेनच्या दूतावासाने इस्रायल नागरिकांच्या संपर्कासाठी एक मेल आयडी दिला आहे. या मेल आयडीवर नागरिकांनी आपलं ओळखपत्र, नागरिकत्वाचा पुरावा, जन्मतारीख, पासपोर्टचा नंबर, वैशिष्ट्य आणि संपर्कासाठी क्रमांक, अशी माहिती पाठवणं आवश्यक आहे. युक्रेनियन नागरिकत्व असलेले अनेक नागरिक सध्या इस्रायलमध्ये राहत आहे. काहींनी यापूर्वी सैन्यामध्ये कर्तव्यही बजावलं आहे.

09:38 (IST) 28 Feb 2022
पुढचे २४ तास युक्रेनसाठी अत्यंत महत्त्वाचे - राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी संवाद साधला. यावेळी जॉन्सन यांनी आपण युक्रेनला सर्वतोपरी पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. तर यापुढचे २४ तास युक्रेनसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं झेलेन्स्की यांनी जॉन्सन यांना सांगितलं.

09:00 (IST) 28 Feb 2022
रविवारी ६८८ भारतीयांची युद्धभूमीतून सुटका

रविवारी, बुखारेस्ट, रोमानिया आणि बुडापेस्ट, हंगेरी येथून एअर इंडियाच्या तीन विमानांच्या साहाय्याने ६८८ भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात आलं आहे. २१९ लोकांना घेऊन पहिले विमान शनिवारी मुंबईत दाखल झाले.

09:00 (IST) 28 Feb 2022
रशिया-युक्रेन युद्धावर ब्राझीलची तटस्थ भूमिका

आपण पुतिन यांचा निषेध करणार नाही. रशिया युक्रेन युद्धावर ब्राझील तटस्थ भूमिका घेणार असल्याचं ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो यांनी स्पष्ट केल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

08:44 (IST) 28 Feb 2022
युरोपीय संघ युक्रेनला शस्त्रात्र खरेदीसाठी वित्तपुरवठा करणार

आम्ही युक्रेनला आमचा पाठिंबा दर्शवत आहोत. प्रथमच आक्रमणाखाली असलेल्या देशाला युरोपीय संघ शस्त्रे आणि उपकरणे खरेदी आणि वितरणासाठी वित्तपुरवठा करत आहे. आम्ही क्रेमलिनविरुद्धचे आमचे निर्बंध देखील मजबूत करत आहे, अशी घोषणा युरोपीय संघाकडून करण्यात आली आहे.

08:32 (IST) 28 Feb 2022
ब्रिटन, पोलंड युक्रेनच्या मदतीसाठी तयार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पोलिश राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुढील संयुक्त पावले उचलण्यावर या दोघांनीही सहमती दर्शविली.

08:24 (IST) 28 Feb 2022
युक्रेनवरचा हल्ला अन्यायकारक, पूर्वनियोजित - अमेरिकी परराष्ट्र विभाग

युक्रेनमधील लोकांसोबतची आमची भागीदारी स्थिर आणि चिरस्थायी आहे आणि रशियाच्या पूर्वनियोजित, अप्रत्याशित आणि अन्यायकारक हल्ल्याला आमच्या प्रतिसादाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आम्ही युक्रेनच्या तातडीच्या मानवतावादी गरजांवर लक्ष केंद्रित करत आहोत, अशा शब्दात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे.

07:53 (IST) 28 Feb 2022
युद्धविरोधी निदर्शनं केल्यामुळे एका दिवसात २०००हून अधिक जण ताब्यात

रविवारी रशियातील ४८ शहरांमध्ये झालेल्या युद्धविरोधी निदर्शनांमध्ये पोलिसांनी २००० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. एका निषेध देखरेख गटाने सांगितले की, लोकांनी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल त्यांचा राग दर्शविण्यासाठी अधिकाऱ्यांचा अवमान केला. गुरुवारी आक्रमण सुरू झाल्यापासून विविध युद्धविरोधी निदर्शनांमध्ये ५,५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. Russian military multiple rocket launcherपुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

Story img Loader