पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आजपासून रशियाच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधान म्हणून हा इम्रान खान यांचा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे इम्रान खान रशियामध्ये पोहचले तोपर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा करुन अवघे काही तास उलटले होते. मात्र त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे विमानातून उतरल्या उतरल्या त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी या युद्धाला ‘रोमांचक’ असं म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इम्रान खान यांचं मॉस्को विमानतळावर रशियन अधिकाऱ्यांनी स्वागत केलं. स्वागत स्वीकारुन विमानतळाबाहेर येताना इम्रान खान यांचा व्हिडीओ आता समोर आला असून यामध्ये ते रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसताय. या व्हिडीओमध्ये रशिया- युक्रेन युद्धासंदर्भात भाष्य करताना इम्रान यांनी, “मी इथे दाखल होण्याची वेळ ही खूप रोमांचक वेळ आहे,” असं वक्तव्य केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बुधवारपासून इम्रान खान हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मागील दोन दशकांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानाने रशियाचा दौरा केलेला नाही. इम्रान खान हे या दौऱ्यादरम्यान रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होतील.

नक्की वाचा >> Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात?

या व्हिडीओवर अनेकांनी संतापजनक तसेच मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात. काहींनी पहिल्यांदाच एवढा मान मिळत असल्याने इम्रान खान यांना यात रोमांचक वाटत असल्याचा टोला लगावलाय तर काहींनी हे आता आमेरिकेची बाजू कायमची सोडण्याचं लक्षणं असल्याचं म्हटलंय.

अमेरिकेबरोबरच इतर देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले असतानाच इम्रान खान यांचा हा दौरा पार पडत आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर हे निर्बंध आणखीन कठोर होण्याची शक्यता असताना इम्रान यांचा हा दौरा आता पाकिस्तानबरोबरच जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय.

युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war exciting time to be in russia says pak pm imran khan on maiden visit scsg