रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला महिना उलटला असून आतापर्यंत हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे युद्ध थांबावं यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न सुरु असताना अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. दरम्यान भारताने याबाबत सावध भूमिका घेतली असल्याने युक्रेनने याआधी नाराजी जाहीर केली आहे. याशिवाय रशियाचा चांगला मित्र असल्याने भारताने मध्यस्थी करावी अशी मागणीही याआधी करण्यात आली आहे. त्यातच आता युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिमित्रो कुलेबा यांना यासंबंधी भाष्य केलं आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.
दिमित्रो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात मधस्थी करावी का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “जर नरेंद्र मोदी मध्यस्थाची भूमिका निभावण्यास इच्छुक असतील तर आम्ही त्यांच्या या प्रयत्नांचं स्वागत करु”.
यावेळी त्यांनी युक्रेन हा भारतीय उत्पादनांचा विश्वासार्ह ग्राहक असल्याचंही नमूद केलं. ते म्हणाले की “आम्ही नेहमीच भारतीय अन्न सुरक्षेचे हमीदार राहिलो आहोत. आम्ही तुम्हाला नेहमी सूर्यफूल तेल, धान्य आणि इतर उत्पादने पुरवतो. हे एक फायदेशीर नातं आहे”.
“आम्ही विनंती करतो की तुमचे रशिया आणि पुतीन यांच्यासोबत असलेल्या चांगल्या संबंधांचा फायदा घेत हे युद्ध थांबवा,” असं यावेळी दिमित्रो म्हणाले. “रशियात एकमेव व्यक्ती सर्व निर्णय घेत आहे ती म्हणजे पुतीन. त्यामुळे हे युद्ध कसं थांबवावं यासाठी तुम्ही थेट त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी सांगितलं. फक्त पुतीन यांनाच युद्ध हवं असल्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. युक्रेन आपला बचाव करत असल्याचं सांगताना दिमित्रो यांनी यावेळी भारत युक्रेनला मदत करेल अशी आशा व्यक्त केली.