रशियानं युक्रेनवर हल्ला चढवून आता जवळपास दहा दिवस उलटले आहेत. जगभरातून एकूण १४१ देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांशी संबंधित एकूण २८ देशांनी युक्रेनला युद्धात मदत करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अण्वस्त्र सेनेला सज्ज राहाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा अण्वस्त्रांचं भीषण संकट घोंघावू लागलं आहे. रशियानं मात्र या संपूर्ण परिस्थितीसाठी पाश्चात्य देशांनाच जबाबदार धरलं आहे.
सगळं खापर पाश्चात्य देशांवर फोडलं!
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी याआधीच “तिसरं जागतिक युद्ध हे अण्वस्त्र युद्धच असेल”, असं स्पष्ट केलं आहे. यानंतर अण्वस्त्र युद्धाचे ढग गडद होऊ लागल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर लॅव्हरोव्ह यांनी या सगळ्याचं खापर मात्र पाश्चात्य देशांवर फोडलं आहे.
रशिया आणि विदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये लॅव्हरोव्ह यांनी यासंदर्भात रशियाची भूमिका मांडली आहे. “मला हे स्पष्ट करायचं आहे की अणुयुद्धाची खुमखुमी आम्हाला नसून ती पाश्चात्य देशांना आहे”, असं लॅव्हरोव्ह म्हणाले आहेत. “त्यामुळे मी तुम्हाला खात्री देतो, की आमचं संतुलन बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना आम्ही बळी पडणार नाही”, असं देखील लॅव्हरोव्ह म्हणाले आहेत.
अमेरिकेची नेपोलियन आणि हिटरलशी तुलना!
दरम्यान, यावेळी बोलताना लॅव्हरोव्ह यांनी अमेरिकेची फ्रान्सचा एकेकाळचा अधिपती नेपोलियन बोनापार्ट आणि जर्मन हुकुमशाहा अडॉल्फ हिटलर यांच्याशी केली आहे. “त्यांच्या काळात नेपोलियन आणि हिटलर हे दोघेही युरोपवर दबाव टाकण्याचं काम करत होते. आता अमेरिका ते काम करत आहे”, असं लॅव्हरोव्ह म्हणाले.