रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियन सैन्य राजधानी किव्हकडे आगेकुच करत असून क्षेपणास्त्र हल्ला सुरुच आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी चर्चेसाठी तयार आहे, परंतु बेलारूसमध्ये नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे युद्ध सुरूच राहणार आहे. युक्रेनमध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांना रशियाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. तर अनेक भारतीय विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. त्यापैकी एका विद्यार्थीनीनं युक्रेनमधून मायदेशी परतण्यास नकार दिला आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या हरियाणातील नेहा नावाच्या मुलीने युद्ध सुरू असतानाही देश न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणाली की, तिने तिथे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ती राहत होती त्या घराचा मालक पत्नी आणि मुलांना सोडून युक्रेनियन सैन्यात सामील झाला आहे. तीन लहान मुलांचा सांभाळ करण्यात ही मुलगी त्या मालकाच्या पत्नीला साथ देत आहे.
द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, नेहाने गेल्या वर्षी युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. नेहाची आई हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील शिक्षिका आहे. दरम्यान, युक्रेन न सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने आईला सांगितले की, “मी कदाचित जगणार नाही पण परिस्थिती बिघडत असतानाही मी मालकाची मुलं आणि त्यांच्या आईच्या पाठीशी उभी राहील.”