रशिया आणि युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत आहे. भारतीय शेअर बाजारातही गेल्या आठवड्यापासून कमालीची घसरण दिसून आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यातही भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सेन्सेक्समध्ये ७०० अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक १.३१ टक्क्यांच्या घसरणीसह ५५१२५.६२ च्या पातळीवर उघडला. याशिवाय निफ्टीत १.२७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून हा निर्देशांक १६,५०० च्या खाली उघडला.
आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे २८ फेब्रुवारीला, निफ्टीच्या टॉप घसरणीच्या यादीत टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स, बजाज फायनान्स आणि टायटन सारखे शेअर्स आहेत. याशिवाय ONGC, Hindalco, IOC, पॉवर ग्रिड आणि GAIL या शेअर्समध्ये निफ्टीत वाढ दिसून आली आहे.
Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात गहू महागला असून ८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा १०० अमेरिकन डॉलर्सच्या वर गेली आहे.
या कारणांमुळे शेअर बाजारावर होतो परिणाम
- आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही शेअर्सच्या किमतीवर परिणाम होतो. रशिया-युक्रेन वादाप्रमाणेच भारत-चीन वादामुळे गुंतवणूकदार स्टॉकमधून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे शेअर्सच्या किमतीत चढ-उतार होत असतात.
- अर्थसंकल्प सादर करताना सरकारने केलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक घोषणांमुळे शेअर्सच्या किमतीतही चढ-उतार होत असतात.
- देशातील राजकीय स्थैर्य (बहुसंख्य सरकार किंवा युती), राजकीय वातावरण यासारख्या घटकांचाही गुंतवणूकदारांच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. राज्यांच्या विधानसभा निकालांचा शेअर बाजारावरही परिणाम होतो. सध्याच्या सरकारच्या विजयामुळे आपली धोरणे सुरू ठेवण्याचा आत्मविश्वास कायम आहे, त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी सुरू करतात, ज्यामुळे बाजाराला उभारी मिळते.
- भारत हा कृषीप्रधान देश आहे. हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला तर शेअर बाजारात तेजी येते. चांगल्या पावसामुळे अन्नधान्याचे उत्पादन अधिक होईल, असा गुंतवणूकदारांचा अंदाज असतो. म्हणजे कृषी आधारित उद्योगाची वाढ अधिक होईल, या दृष्टीने गुंतवणूक केली जाते.
- या उद्योगांमध्ये ट्रॅक्टर, खते, बियाणे, कीटकनाशके, बाइक्स आणि एफएमसीजी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचा व्यवसाय आणि नफा वाढेल, असे गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी वाढते.
- रिझव्र्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना व्याज दर कमी केल्यास कर्जावरील व्याज स्वस्त होतील. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढेल आणि शेवटी बँकांचा नफा वाढेल. यामुळे गुंतवणूकदार बँका आणि NBFC चे शेअर्स खरेदी करतात आणि त्यांच्या किमती वाढतात.
- आरबीआयच्या आर्थिक आढाव्यात (व्याजदरात कपात किंवा वाढ), सरकारचे राजकोषीय धोरण (कर दरात कपात), वाणिज्य धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण इत्यादी कोणत्याही बदलामुळे किमतीत चढ-उतार होतात.