वृत्तसंस्था, मॉस्को
युक्रेनच्या सुमी शहरावर रविवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे लक्ष्य लष्करी अधिकारी होते असा दावा रशियाने सोमवारी केला. रशियाने डागलेल्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी किमान ३४ जणांचा मृत्यू झाला आणि ११७ जण जखमी झाले आहेत. हे हल्ले भयंकर असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. तसेच संयुक्त राष्ट्रे आणि युरोपीय महासंघाने रशियावर जोरदार टीका केली.
युक्रेनमध्ये जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये लष्करी सुविधा स्थापन केल्या जातात आणि आणि लष्करी कार्यक्रम आयोजित केले जातात, तसेच त्यासाठी सामान्य नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला जातो असा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तसेच रशिया केवळ लष्करी ठिकाणांवरच हल्ले करत असल्याचे क्रेमलिनतर्फे सांगण्यात आले. रशियाच्या आरोपांवर युक्रेनने अद्याप उत्तर दिलेले नाही.
दरम्यान रशियाने केलेला हा गंभीर युद्धगन्हा आहे अशी टीका जर्मनीचे नियोजित चान्सेलर फ्रेडरिक मर्झ यांनी केली आहे.
सुमीमध्ये युक्रेनच्या लष्कराची रणनीती ठरवण्यासाठी बैठक सुरू होती, त्यावर आम्ही इस्कंदर-एम क्षेपणास्त्रे सोडली. या हल्ल्यांमध्ये ६०पेक्षा जास्त सैनिक ठार झाले.
रशियाचे संरक्षण मंत्रालय
ट्रम्प यांना युक्रेन भेटीचे आमंत्रण
युद्धविरामासाठी रशियाबरोबर कोणताही करार करण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला भेट द्यावी असे आमंत्रण त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिले आहे. सीबीएस वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये झेलेन्स्की म्हणाले की, ‘‘कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, कोणत्याही वाटाघाटी करण्यापूर्वी उद्ध्वस्त झालेले किंवा ठार झालेले लोक, नागरिक, योद्धे, रुग्णालये, चर्च, लहान मुले पाहण्यासाठी या.’’ रविवारी रशियाने सुमी शहरावर केलेल्या हल्ल्यात किमान ३४ जणांचा मृत्यू झाला. हे हल्ले म्हणजे चूक होती असे आपल्याला सांगण्यात आले असे ट्रम्प म्हणाले. मात्र, ही कबुली रशियाने दिली की अन्य कोणी हे त्यांनी स्पष्ट केले नाही.