Russia Ukraine Crisis Live Today, 1 March: राजधानी कीवसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.


रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी लवकरच चर्चेची दुसरी फेरी ‘त्वरित युद्धविराम आणि युक्रेनमधून रशियन सैन्याची माघार हा युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांतता चर्चेचा मुख्य उद्देश आहे’, असे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.

Live Updates

Russia Ukraine Crisis Live News: रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये सात मुलांसह १०२ नागरिकांचा मृत्यू आणि ३०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी दिली.

20:10 (IST) 1 Mar 2022
युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली.

चार्ल्स मिशेल यांनी ट्विट केले की, "निर्दोष नागरिकांवरील रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आज खार्किवमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो."

https://platform.twitter.com/widgets.js

20:01 (IST) 1 Mar 2022

युक्रेनमध्ये मारला गेलेला भारतीय विद्यार्थी पूर्णपणे निर्दोष होता. निरपराध लोकांची हत्या थांबली पाहिजे आणि चर्चा पुन्हा सुरू झाली पाहिजे. लोकं जगली पाहिजेत, त्यांनी जीवनाचा आनंद लुटला पाहिजे, ती मारली जाऊ नये, असं भारतातील चेक रिपब्लिक दूतावासाचे अधिकारी रोमन मासारिक यांनी म्हटलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

19:22 (IST) 1 Mar 2022
रशिया-युक्रेन चर्चेची दुसरी फेरी २ मार्च रोजी होणार

रशिया-युक्रेन चर्चेची दुसरी फेरी २ मार्च रोजी नियोजित आहे, रशियाच्या TASS वृत्तसंस्थेने मंगळवारी रशियन स्त्रोताचा हवाला देऊन अहवाल दिला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

18:33 (IST) 1 Mar 2022

भारतीय नागरिकांना घेऊन ऑपरेशन गंगाचे विशेष विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्लीकडे रवाना झाले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

18:20 (IST) 1 Mar 2022
युक्रेन-रशिया युद्धावर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशिया युद्धावर आज संध्याकाळी ६ वाजता एक उच्चस्तरीय बैठक बोलावली.

https://platform.twitter.com/widgets.js

17:45 (IST) 1 Mar 2022
युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांशी पंतप्रधान मोदी बातचीत करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलून त्यांच्याकडून नवीनच्या वडिलांचा नंबर घेतला. पीएम मोदी लवकरच नवीनच्या कुटुंबीयांशी बोलणार आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

17:08 (IST) 1 Mar 2022
खार्किव्हमधील गोळीबारावर झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया

रशियान मिसाईलने खार्किव्ह शहरातील मध्यवर्ती चौकात धडक दिली. हे गंभीर दहशतवादी कृत्य आहे. या हल्ल्यानंतर रशियाला कोणीही माफ करणार नाही आणि कोणीही हा हल्ला विसरणार नाही,” असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले.

16:29 (IST) 1 Mar 2022

आपल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी पंतप्रधान दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहेत. युक्रेनमध्ये एअरस्ट्रीप, एअरपोर्ट शिल्लक नसल्याने लोकांना परत आणण्यास अडचण होत आहे. तरीही, आम्ही आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी युक्रेन सरकार, शेजारील देशांच्या सरकारांशी बोलत आहोत, असं संत कबीर नगरमध्ये बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

16:21 (IST) 1 Mar 2022

नवीन शेखरप्पा असं युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील रहिवासी होता. मुख्यमंत्री बोम्मई विद्यार्थ्याच्या वडिलांशी बोलले. नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहेत,अशी माहिती कर्नाटक मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाने दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

15:46 (IST) 1 Mar 2022
खार्कीव्हमधली बिघडलेली परिस्थिती ही चिंतेची बाब

गोळीबारामुळे आज खार्किवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. खार्किवमधील बिघडलेली परिस्थिती ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्या शहरातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि सुरक्षा याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, आम्ही स्लोव्हाकियामधील संपूर्ण निर्वासन ऑपरेशनमध्ये समन्वय साधू आणि युक्रेनमधून येणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसासाठी त्यांच्या सरकारकडून सहकार्य घेऊ. त्यांना सुरक्षितपणे परत आणणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असं केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत ते स्लोव्हाकिया इथं जात आहेत.

15:08 (IST) 1 Mar 2022
खार्कीव्हमधल्या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू

युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे.

14:00 (IST) 1 Mar 2022
खार्कीव्हच्या मुख्य सरकारी कार्यालयावर रशियाने टाकला बॉम्ब

राजधानी किव्हनंतर सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या खार्कीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने बॉम्ब फेकलाय. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय.

13:54 (IST) 1 Mar 2022
रुमानियामधून भारतीयांना घेऊन आलेलं विमान दिल्लीत दाखल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणारं एक विमान दिल्लीत दाखल झालं आहे. रुमानियामधून हे विमान दिल्लीत आलं असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या विमानातील नागरिकांचे मायदेशात स्वागत केलं. सर्व भारतीयांना मायदेशी आणण्याचे भारत सरकार सर्व प्रयत्न करत असल्याचं मांडविया यांनी म्हटलं.

13:07 (IST) 1 Mar 2022
हरदीप सिंग पुरी बुडापेस्टकडे रवाना

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हंगेरीतल्या बुडापेस्टला जात आहेत.

12:32 (IST) 1 Mar 2022
तात्काळ कीव सोडा, दूतावासाच्या भारतीयांना सूचना

विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तातडीने कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही माध्यमांद्वारे तातडीने कीव सोडण्याच्या सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिल्या आहेत.

12:11 (IST) 1 Mar 2022
'ऑपरेशन गंगा'मध्ये आता हवाई दलाचाही सहभाग; सी-17 विमाने करणार तैनात

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कमी कालावधीत अधिक लोकांना बाहेर काढलं जाऊ शकतं. भारतीय हवाई दल आजपासून ऑपरेशन गंगाचा भाग म्हणून अनेक सी-17 विमाने तैनात करण्याची शक्यता आहे.

11:49 (IST) 1 Mar 2022
पुतीन यांचा ब्लॅक बेल्ट काढला; तायक्वांदो संघटनेचा आपल्या परीनं निषेध

युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा मानद तायक्वांदो ब्लॅक बेल्ट काढून घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून देशाला निलंबित केल्यानंतर आता पुतिन यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जागतिक तायक्वांदो संघटनेने 'विजयापेक्षा शांतता अधिक महत्त्वाची' असल्याचं सांगत पुतिन यांच्यावर कारवाई केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

11:29 (IST) 1 Mar 2022
रशिया युक्रेन युद्धाचे ऑटोमोबाईल क्षेत्रावरही गंभीर परिणाम

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे ऑटोमोबाईल उद्योगावर अनेक विपरीत परिणाम झाले आहेत. ऑटोमेकर फोक्सवॅगन, रेनॉल्ट आणि टायर निर्मात्या नोकिया टायर्ससह अनेक कंपन्यांनी शुक्रवारी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर उत्पादन बंद करण्याची किंवा हलवण्याची योजना आखली. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या जागतिक सेमीकंडक्टर टंचाईमुळे वाहन उद्योग आधीच वाहनांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणीत आला होता. असं मानलं जातं की या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, कारण युक्रेन आणि रशिया अनेक महत्त्वपूर्ण वस्तूंचे उत्पादन करतात, ज्या जागतिक स्तरावर निर्यात केल्या जातात आणि पुरवठा साखळीचा भाग आहेत.

11:08 (IST) 1 Mar 2022
युक्रेनमधल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना युक्रेनसह विविध मुद्द्यांवर माहिती दिली.

10:47 (IST) 1 Mar 2022
झालं ते पुरे झालं, आता...; संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

संयुक्त राष्ट्रांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तातडीची बैठक बोलावली होती. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात फक्त ११व्यांदा अशी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरेस यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली.“झालं ते पुरे झालं. आता युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलंच पाहिजे”, असं अँटोनियो गुटेरेस म्हणाले आहेत. “आता सैनिकांनी पुन्हा त्यांच्या बरॅक्समध्ये परतायला हवं. नेत्यांनी शांतता ठेवायला हवी. सामान्य नागरिकांचं रक्षण व्हायलाच हवं”, असं ते म्हणाले.

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

10:10 (IST) 1 Mar 2022
उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने हलचाली सुरु केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीमध्ये याच विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीनंतर सोमवारी रात्री उशीरा पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर पडण्यासाठी मदत करुन आश्रय देणाऱ्या युक्रेन शेजराच्या देशांच्या पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे आभार मानले. सविस्तर बातमी येथे वाचा.

10:08 (IST) 1 Mar 2022
रशियन क्षेपणास्त्रे, विमाने, हेलिकॉप्टरसाठी नो-फ्लाय झोन लागू करणार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमर झेलेन्स्की यांनी सोमवारी सांगितले की, युक्रेनियन शहर खार्किववरील रशियन गोळीबाराच्या प्रत्युत्तरात रशियन क्षेपणास्त्रे, विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी नो-फ्लाय झोन लागू करण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मात्र नो-फ्लाय झोन कसा आणि कोणाद्वारे लागू केला जाईल हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. ते म्हणाले की रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून गेल्या पाच दिवसांत ५६ रॉकेट हल्ले केले आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्रे डागली.

10:01 (IST) 1 Mar 2022
NATO प्रमुखांनी जो बायडनसह विविध देशांच्या प्रमुखांना केला फोन

नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातल्या प्रमुख नेत्यांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चा केली. रशिया युक्रेनमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, रोमानिया, जपान या देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला.

09:19 (IST) 1 Mar 2022
रशिया युक्रेन युद्ध परिस्थितीवरून भाजपा खासदाराचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर

भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुब्रह्मण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रहमण्यम स्वामींनी उपस्थित केला आहे. रशिया हा ब्रिक्स देशांचा सदस्य राष्ट्र असल्याचा संदर्भ देत स्वामींनी ही टीका केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

09:06 (IST) 1 Mar 2022
रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय. बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भाषणात म्हटलं होतं. या सैनिकांनी रशियन नौदलाच्या जहाजाला नरकात जा असं सांगितल्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आढळून आलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

08:13 (IST) 1 Mar 2022
युक्रेनवर क्लस्टर ब़ॉम्ब आणि व्हॅक्यूम बॉम्ब डागल्याचा रशियावर आरोप

मानवाधिकार गट आणि युक्रेनचे अमेरिकेतील राजदूत यांनी सोमवारी रशियावर युक्रेनियन लोकांवर क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्यूम बॉम्बसह हल्ला केल्याचा आरोप केला, ज्याचा विविध आंतरराष्ट्रीय संघटनांनी निषेध केला आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच या दोघांनीही म्हटले आहे की रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित क्लस्टर युद्धसामग्री वापरली असल्याचे दिसून आले आहे, अॅम्नेस्टीने त्यांच्यावर ईशान्य युक्रेनमधील प्रीस्कूलवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे तर नागरिकांनी आत आश्रय घेतला आहे. रशियाने बंदी असलेला 'व्हॅक्युम बॉम्ब वापरल्याचा आरोप अमेरिकेतील युक्रेनच्या राजदूताने केला आहे. जिनेव्हा करारानुसार रासायनिक, जैविक सह काही शस्त्रांचा युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत वापर करण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये 'व्हॅक्युम बॉम्ब'चा समावेश होतो. या बॉम्बचा आघात झाल्यावर स्फोट होतांना आजुबाजुच्या परिसरातील ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. त्यामुळे याचा स्फोट नेहमीच्या बॉम्बपेक्षा अधिक तीव्र असतो. तसंच या बॉम्बचा स्फोट झाल्यावर ज्या ध्वनी लहरी सर्व बाजूंना वेगाने अधिक जास्त अंतरापर्यंत पसरल्या जातात, त्यामुळे याची संहारकता वाढते, या परिसराचे मोठे नुकसान होते. यामुळेच बॉम्बचा वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

08:01 (IST) 1 Mar 2022
रशिया रग्बी आणि हॉकीतूनही बाहेर!

जागतिक रग्बी कार्यकारी समितीने एका निवेदनात, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या शिफारशींसह, पुढील सूचना मिळेपर्यंत रशिया आणि बेलारूसला सर्व आंतरराष्ट्रीय रग्बी आणि क्रॉस-बॉर्डर क्लब रग्बी सामने आणि इतर कार्यक्रमांपासून तात्काळ आणि पूर्णपणे निलंबित केलं आहे. इंटरनॅशनल आइस हॉकी फेडरेशन कौन्सिलने एका निवेदनात सर्व रशियन आणि बेलारशियन राष्ट्रीय संघ आणि क्लबना पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक वयोगटातील आणि सर्व IIHF स्पर्धांमध्ये किंवा इव्हेंटमध्ये भाग घेण्यापासून निलंबित केले आहे.

07:56 (IST) 1 Mar 2022
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून रशियन संघ निलंबित; FIFA, UEFA चा निर्णय

युक्रेन देशावर केलेल्या आक्रमणामुळे FIFA आणि UEFA ने रशियाच्या राष्ट्रीय संघांना आणि क्लबना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित केले आहे. या निर्णयामुळे रशियाला यंदाच्या विश्वचषक आणि महिला युरो स्पर्धेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. रशिया २४ मार्च रोजी विश्वचषक पात्रता प्लेऑफमध्ये पोलंडचे यजमानपद भूषवणार होता आणि जर ते त्या वेळी निलंबित राहिले तर ते विश्वचषकातून बाहेर होतील आणि नोव्हेंबरमध्ये कतारमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार नाहीत.

रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये सात मुलांसह १०२ नागरिकांचा मृत्यू आणि ३०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी दिली. रशियाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सांगितली जाते त्याहून अधिक असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

Russia Ukraine War Live

(फोटो सौजन्य- Reuters)

युक्रेनमधून आलेल्या निर्वासितांना २७ युरोपीय देशांमध्ये तीन वर्षांपर्यंत राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार देण्याची तयारी युरोपीय महासंघ करीत असल्याची माहिती युरोपीय महासंघ आणि फ्रेंच अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली. आतापर्यंत सुमारे तीन लाख युक्रेनियन निर्वासितांनी युरोपीय महासंघातील देशांमध्ये प्रवेश केला असून आम्हाला आणखी लाखो निर्वासितांना प्रवेश देण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार सुमारे पाच लाख निर्वासितांनी युरोपिय महासंघाचे सदस्य असलेल्या पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी या युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला आहे.