Russia Ukraine War Updates: पाश्चिमात्य आणि इतर राष्ट्रांनी अनेक निर्बंध लादूनही रशियाने गुरुवारी युक्रेनवर आक्रमण केले. रशियन आक्रमणातून पळून आलेल्या निर्वासितांना अमेरिकेने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की नाटो आपल्या देशाला या जागतिक संघटनेमध्ये प्रवेश देण्यास घाबरत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये राहणाऱ्या २०,००० भारतीयांपैकी ४,००० भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे.
Russia Ukraine War News: युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या सैन्याला सत्ता आपल्या हातात घेण्याचं आवाहन केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) चे कार्यकारी मंडळ (EB) सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांना सध्या रशिया किंवा बेलारूसमध्ये नियोजित त्यांच्या क्रीडा स्पर्धांचे स्थलांतर किंवा रद्द करण्याचे आवाहन केलं आहे.
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनसाठी लढण्यासाठी 'लढाईचा अनुभव' असलेल्या युरोपियन लोकांना बोलावले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चाललेल्या युद्धात आता चीननेही उडी घेतली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना फोन केला आहे. युक्रेनशी वाटाघाटी करण्याचं आवाहन जिनपिंग यांनी पुतिन यांना केलं आहे.
युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवली की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिलं आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले आहे. कारण रशियाने आपली लष्करी कारवाई सुरू ठेवली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे सैन्य ईशान्य आणि पूर्वेकडून युक्रेनची राजधानी कीवजवळ येत आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटात युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाची अनेक विमानेही नष्ट झाली आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर जगभरातील सर्व देश चिंता व्यक्त करत आहेत. त्याचवेळी युक्रेन संकटावर वक्तव्य करताना तालिबानने दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन तालिबानने केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारती नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. मात्र, त्यासाठी सरकारने नियोजन केले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, हे सर्व विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. मूळची अमृतसरची असलेल्या एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी तळघरात आश्रय घेतल्याचे दिसत आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहाच्या तळघरात असून, ते खूप घाबरलेले दिसत आहेत. तर, युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना भारत सरकारने आखली आहे.
काय आहे ही योजना? येथे वाचा...
किरणोत्सारासाठी पृथ्वीवरील सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या चेर्नोबिल अणु भट्टी परिसरात किरणोत्सराचे खास करुन गॅमा किरणांच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याची माहिती युक्रेनच्या अणु ऊर्जा नियंत्रण विभागाने दिली आहे. विशेषतः रशियाचे सैन्य चेर्नोबिल परिसरात पोहचल्यावर हे प्रमाण वाढल्याचं युक्रेनने स्पष्ट केलं आहे. प्रवेशास बंदी असलेल्या भागात रशियाच्या लष्करी वाहनांच्या हालचालीने या भागातील धूळ ही हवेत मिसळली. ही धुळ काही प्रमाणात किरणोत्सारीत असल्याने या भागात किरणोत्सराचे प्रमाण वाढल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
युक्रेनच्या सीमेवरुन बाहेर पडतांना वाहनांवर तिरंगा लावा, अशा सूचना युक्रेनमधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांना दिल्या आहेत.
रशियावर सायबर हल्ला झाला आहे. रशिया सरकारच्या अनेक वेबसाईट्स बंद पाडण्यात आल्याचा दावा हॅकर्सच्या एका गटाने केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने आपण रशियाच्या वेबसाईट्स बंद पाडल्याचा दावा या हॅकर्सच्या गटाने केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांची यादी ट्वीट केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या,
शिवानी लोणकर आणि महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, मुंबईतील अनेक विद्यार्थी/व्यक्ती युक्रेनमध्ये अडकले आहेत. या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य अत्यंत तणावात आहेत. यापैकी काही व्यक्तींची यादी सोबत जोडली आहे.
युक्रेनच्या संरक्षण दलाने नुकतेच पुन्हा ट्विट केले आहे, सर्व नागरिकांना त्यांच्या वयाची पर्वा न करता सैन्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. कमांडर ऑफ ट्रूप्स, युरी गालुश्किन म्हणाले, आज, युक्रेनला सर्व गोष्टींची गरज आहे. त्यामुळे सैन्यात सामील होण्याच्या सर्व प्रक्रिया सोप्या केल्या आहेत. फक्त तुमचा पासपोर्ट आणि ओळख क्रमांक आणा. कोणतेही वयोमर्यादा नाहीत. साइन अप करताना समस्या येत असल्यास, त्यांनी फक्त या अधिकृत ट्विटचा संदर्भ घेणे आवश्यक आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना भारतात आणण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने गांभीर्याने घेतले असून तेथील भारतीय लोकांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. गृहमंत्री राजनाथ सिह यांच्याशी बोलणं झाले आहे. या देशांमध्ये अडकलेल्यांपैकी विदर्भातल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या विमान पाठवू शकत नाही पण योग्य वेळी प्रयत्न करून त्यांना परत आणण्यात येईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे पालक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या पाल्यांना परत आणण्यासाठी मदत करा अशी मागणी या पालकांनी पवारांकडे केली आहे. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी सध्या अडकले आहेत.
रशियाचे सैन्य राजधानी कीवमध्ये घुसल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. येत्या ९६ तासांत म्हणजे ४ दिवसांत कीव रशियाच्या ताब्यात जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की रशियन सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले आहे. त्यांनी रशियन नागरिकांना या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
दरम्यान अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला असून आणखी निर्बंध लावले जातील असं स्पष्ट केलं आहे. तर संयुक्त राष्ट्राने रशियाला शांतता ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. दुसरीकडे भारतानेही भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे. युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे.