किव्ह : रशियाने सलग दुसऱ्या रात्री संपूर्ण युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यात धान्य आणि तेल टर्मिनल्ससह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. तर, किमान १२ नागरिक जखमी झाले, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. हवाई हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य ओडेसा हे बंदर होते.
क्रिमियामधील रशियन आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करी सुविधा केंद्राला आग लागल्याने चार गावांमधून २ हजार २०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. रशियामार्फत क्रिमियामध्ये नियुक्त अधिकारी सेर्गेई अक्स्योनोव्ह यांनी सांगितले की, एक महत्त्वपूर्ण राज्य मार्ग बंद करण्यात आला आहे.
लष्कारी सुविधा केंद्राला आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अधिकाऱ्याने कोणतीही माहिती दिली नाही. दोन दिवसांपूर्वीच रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या पुलावर हल्ला झाला होता. या घटनेला युक्रेन जबाबदार असल्याचे रशियाने म्हटले होते. किव्हचे सैन्य प्रशासनप्रमुख सरही पोपको यांनी ‘टेलीग्राफ‘वर सांगितले की, युक्रेनवरील हल्ल्याची रात्र भीषण होती. युक्रेनच्या बहुतांश भागावर गेल्या काही दिवसांपासून क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले झाले आहेत.सलग दुसऱ्या रात्री हल्ला झाला आहे. ओडेसा हे शहर विशेषत: लक्ष्य करण्यात आले. यामध्ये पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून किमान १२ नागरिक जखमी झाले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.