एकीकडे जागतिक पातळीवर जी-२० परिषदेत भारत, अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखे देश परस्पर सहकार्य, शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने उग्र रुप धारण केले आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष आता नाटो देशांपर्यंत पोहोचला आहे. आज (१६ नोव्हेंबर) रशियाने डागलेले क्षेपणास्त्र पोलंड देशात पडले आहे. या घटनेत दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. रशियाच्या या कृतीमुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> भारताची ऊर्जासुरक्षा जगासाठी महत्त्वाची; जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ठाम प्रतिपादन
मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आतापर्यंत फक्त या दोनच देशांपर्यंत सीमित होते. आता मात्र रशियाने डागलेले क्षेपणास्त्र नाटोचा सदस्य असलेल्या पोलंड देशावर पडले आहे. यामध्ये पोलंडमधील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या या कृतीचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी निषेध केला आहे.
हेही वाचा >>>रशियाविरुद्ध कडक भूमिका; तीव्र निषेधासाठी ‘जी-२०’मध्ये अमेरिका-युक्रेन आग्रही; काही राष्ट्रांची मात्र सावध भूमिका
तर रशियाच्या या कृतीची पोलंड सरकारनेदेखील दखल घेतली आहे. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्यूझ मोरविकी यांनी ‘प्राथमिक अंदाजानुसार डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशिय बनावटीचे आहे. मात्र आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. हे क्षेपणास्त्र नेमके कोणी डागले, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही. आमची यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. आम्ही आमची लष्करी तयारी करत आहोत,’ असे सांगितले आहे. तर पोलंडच्या परराष्ट्र खात्यानेदेखील डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे रशियान बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा अचानक राजीनामा; कारण काय?
दरम्यान, रशियाच्या या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्य जो बायडेन यांनी एकीकडे जी-२० शिखर परिषद सुरू असतानाच दुसरीकडे इंडोनेशियामध्ये जी-७ आणि नाटो सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच नाटोचे सरचिटणीस जेम्स स्टोल्टेनबर्ग यांनीदेखील नाटो सदस्य देशांच्या राजदुतांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.