कीव्ह : गेल्या आठवडय़ात युक्रेनमधील अनेक शहरांवर केलेल्या हल्ल्यांनंतर युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने सोमवारी पुन्हा हल्ले केले. त्यामुळे कीव्हचा मध्यवर्ती भाग पुन्हा एकदा अनेक स्फोटांनी हादरला. अनेक इमारतींना आग लागली व नागरिकांना निवारागृहांचा आश्रय घ्यावा लागला. या हल्ल्यात रशियन लष्कराने इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनचाही वापर केला.
यापूर्वी रशियाने कीव्हवर केलेल्या हवाई हल्ल्यांत बहुतांश क्षेपणास्त्रांचा समावेश होता.
या हल्ल्यात किती ड्रोनचा वापर झाला, हे समजू शकले नाही. कीव्ह शहराचे महापौर व्हिटाली क्लिचको यांनी सांगितले, की राजधानीतील मध्यवर्ती भाग शेवचेन्कोला या हल्ल्यांचा मोठा फटका बसला. अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले. एका इमारतीला आग लागली. येथून १८ जणांची सुटका करण्यात आली असून, ढिगाऱ्याखाली अजून दोघे अडकले होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता.
असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने हल्ला करणाऱ्या ड्रोनचे छायाचित्र टिपले आहे. मात्र, या हल्ल्यात किती जीवितहानी झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. अलिकडच्या हल्ल्यात रशिया वारंवार ड्रोन वापरत आहे. त्यांनी वीजकेंद्रांसह युक्रेनमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे.
क्रिमिया व युक्रेनला जोडणाऱ्या रशियासाठी महत्त्वाच्या पुलावर युक्रेनने बाँबहल्ला केल्याचा आरोप रशियाने केला होता. युक्रेनला होणारा लष्करी साहित्य व इतर रसद पुरवठा थांबवणे, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, या पुलाचे फारसे नुकसान झाले नाही आणि काही तासांनंतर तो पुन्हा खुला करण्यात आला.
युक्रनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी रात्री आपल्या भाषणात सांगितले, की दोनेस्त्क प्रदेशातील बाखमुट व सोलेदार शहरांभोवती तीव्र संघर्ष सुरू आहे.
शत्रू आम्हाला कमजोर करू शकत नाही- झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी समाजमाध्यमांवर या हल्ल्यांची माहिती देताना सांगितले, की रात्रभर अगदी दुसरा दिवस उजाडेपर्यंत रशियाने आमच्या देशात दहशत माजवली आहे. कामकाझी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे संपूर्ण युक्रेनवर हल्ला करत आहेत. शत्रू आमच्या शहरांवर हल्ला करू शकतो, परंतु आम्हाला कमजोर करू शकत नाही. त्यांनी प्रसृत केलेल्या चित्रफितींमध्ये उडणारे ड्रोन व आकाशात काळय़ा धुराचे लोट व कीव्हच्या मध्यभागात आग स्पष्टपणे दिसत आहेत. एका चित्रफितीत हल्लेखोर ड्रोन पाडण्यासाठीच्या गोळीबाराचा आवाज येत आहे. कीव्हच्या याच भागास आठवडय़ापूर्वी रशियाने लक्ष्य केले होते. क्षेपणास्त्र हल्ल्यात मुलांच्या खेळाचे मैदान आणि कीव्ह राष्ट्रीय विद्यापीठाच्या मुख्य वास्तूजवळच्या चौकाला लक्ष्य केले होते.