एपी, म्युनिक
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी युद्धबंदीसाठी ठोस योजनेसंदर्भात एकमत झाल्यानंतरच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना प्रत्यक्ष भेटण्यास सहमती देणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. रशिया-युक्रेन संघर्ष थांबविण्यासाठी ट्रम्प हे माध्यम असल्याचे झेलेन्सकी म्युनिक येथील सुरक्षा परिषदेत म्हणाले. युरोपमध्ये होत असेलली सुरक्षा बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणाबाबत तीव्र चिंता आणि अनिश्चितता पसरली आहे. म्युनिक सुरक्षा परिषदेत युक्रेनचे भविष्य हा सर्वोच्च अजेंडा आहे.

उपाध्यक्ष वान्स यांना भेटणार

ट्रम्प यांनी याच आठवड्यात युद्ध थांबविण्याबाबत पुतिन यांच्याशी फोनवरून संवादही साधला होता. दरम्यान, झेलेन्स्की अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वान्स यांची भेटही घेणार आहेत. वान्स यांनी जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक-वॉल्टर स्टेनमायर, नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे आणि ब्रिटिश परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. नाटो सदस्यांना संरक्षणासाठी अधिक खर्च करण्याच्या रिपब्लिकन प्रशासनाच्या आवाहनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, युद्धबंदीसंदर्भात चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांच्या विचारांवर वान्स विस्तृत माहिती देतील अशी युरोपला आशा आहे. या परिषदेत वान्स यांनी युरोपियन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व बेकायदेशीर स्थलांतरावर भाष्यही केले.

Story img Loader