पीटीआय, वॉशिंग्टन
‘रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनबरोबर युद्धविरामाचा करार करावा. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की चर्चेसाठी तयार आहेत. दोन्ही नेत्यांनी लवकरात लवकर भेटावे,’ असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनबरोबर कराराचा सल्ला देताना यापूर्वी युक्रेनमधील हास्यास्पद युद्ध संपवावे, असे वक्तव्य यापूर्वी केले होते. तसेच, युद्ध थांबले नाही, तर करवाढ आणि निर्बंधांची धमकी रशियाला दिली होती. ट्रम्प म्हणाले, ‘पुतिन यांनी करार करायला हवा.’ रशियाने करार करावा, यासाठी त्यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी निर्बंध लादणार का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, ‘मला माहीत नाही. रशियाने करारासाठी आग्रही हवे. कदाचित त्यांना करार करण्याची इच्छा असेल. मला वाटते, की पुतिन यांना मला भेटायचे आहे. आम्ही लवकरात लवकर भेटू. युद्धभूमीवर सैनिक रोज मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या कित्येक दशकांत इतकी हिंसा आपण पाहिलेली नाही. दुसऱ्या महायुद्धासारखीच इथली युद्धभूमी आहे.’ अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ‘युक्रेन करार करण्यासाठी तयार आहे. झेलन्स्की तयार आहेत. त्यांना युद्ध थांबवायचे आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैनिकांना गमावले आहे. रशियाचे अधिक, जवळपास आठ लाख सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेत तीनदा अध्यक्षपद भूषविण्याबाबत प्रस्ताव

अमेरिकेच्या अध्यक्षांना जास्तीत जास्त तीनदा निवडण्याबाबत रिपब्लिकन खासदारांनी घटनेत सुधारणा करण्यासाठी संसदेत एक संयुक्त ठराव मांडला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तिसऱ्यांदा हे पद सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने टाकलेले हे पाऊल आहे. प्रस्तावित दुरुस्तीनुसार, ‘कोणतीही व्यक्ती तीनहून अधिक वेळा अध्यक्ष पदावर निवडून येणार नाही, किंवा सलग दोनदा निवडून आल्यानंतर, कोणत्याही अतिरिक्त कार्यकाळासाठीही तिची अध्यक्षपदावर निवड होणार नाही. तसेच ज्या व्यक्तीने अध्यक्षपद भूषविले आहे किंवा अध्यक्ष म्हणून दोन वर्षांहून अधिक काळ काम केले आहे, त्या कालावधीत इतर कोणतीही व्यक्ती अध्यक्षपदावर दोनदा निवडून येणार नाही.’

‘बायडेन प्रशासनाच्या विनाशकारी निर्णयांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक संसाधने अध्यक्ष ट्रम्प यांना प्रदान करणे अत्यावश्यक आहे. अमेरिकन नागरिक आणि देशावरील निष्ठा ट्रम्प यांनी वेळोवेळी आपल्या निर्णयांतून दाखवून दिली. देश प्रजासत्ताक बनविण्यासाठी आणि देशाचे रक्षण करण्यासाठी ते नेहमीच समर्पित असतात. आणि खासदार म्हणून त्यांना पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे काँग्रेस सदस्य अँडी ओग्लेस यांनी म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत अमेरिकन नागरिकांनी सहन केलेली अराजकता, दु:ख आणि आर्थिक घसरणीच्या अगदी विरुद्ध असे ट्रम्प यांचे निर्णायक नेतृत्व असल्याचेही ओग्लोस म्हणाले.

केनेडी यांच्या हत्येच्या संदर्भातील फाइल्स खुल्या होणार

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जोन एफ. केनेडी, सिनेटर रॉबर्ट एफ. केनेडी आणि नागरी हक्क नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या हत्येशी संबंधित गोपनीय फाइल्स खुल्या करण्याच्या आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांनी सही केली. अमेरिकी नागरिकांना त्यांच्या हत्येसंदर्भातील सर्व तपशील जाणण्याचा अधिकार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. सर्व गोपनीय फाइल्स खुल्या करण्याचे नियोजन पंधरा दिवसांत कळवावे, असे निर्देश राष्ट्रीय गुप्तचर खात्याला त्यांनी दिले. तसेच, रॉबर्ट एफ. केने़डी आणि मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या हत्येशी संबंधित नोंदींचा तात्काळ आढावा घेऊन यांच्या हत्येशी संबंधित सर्व गोपनीय फाइल्स खुल्या करण्याचे नियोजन ४५ दिवसांत कळवावे, असा आदेश त्यांनी गुप्तचर खात्याला दिला.

क्रिप्टो चलनासाठी अंतर्गत कार्यगटाची स्थापना

क्रिप्टो चलनावर अंतर्गत कार्यगटाची स्थापना करण्याचा आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

क्रिप्टो क्षेत्रात अमेरिकेला जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट यात आहे. मध्यवर्ती बँकेला डिजिटल चलन काढण्यालाही या आदेशाने प्रतिबंध केला आहे. या आदेशानुसार, डिजिटल साधनांच्या नियमनासाठी चौकट आखण्यात येणार आहे.

गर्भपातविरोधी आंदोलकाला माफी

शिकागो : गर्भपाताच्या दवाखान्याचे प्रवेशद्वार अडविल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या गर्भपातविरोधी कार्यकर्त्याला माफ करू, अशी घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी केली. या घोषणेच्या निर्णयावर सही करणे अभिमानाची गोष्ट असेल, असे ते म्हणाले. लॉरेन हँडी याला पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. यासोबतच हँडीसह नऊ सहआरोपींनाही ट्रम्प यांनी माफी जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war volodymyr zelenskyy ready to stop war against russia css