युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला गेलेले मोदी मंत्रिमंडळातील नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये, रोमानियाच्या महापौरांनी मंत्री शिंदे यांना अडवत आठवण करून दिली की या भारतीय विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही केली होती, तुम्ही नाही. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेवटी मदतीसाठी रोमानियन अधिकाऱ्यांचे आभार असे म्हणत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी सरकारच्या चार मंत्र्यांना युक्रेनच्या आसपास असलेल्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहे. हे सर्व लोक ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करत आहेत. शिंदे हे रोमानियामध्ये आहेत. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते भारतीय विद्यार्थ्यांशी बोलत आहेत. जेव्हा शिंदे आपल्या सरकारचे कौतुक करत होते तेव्हा रोमानियाचे महापौरांनी त्यांना अडवले आणि आठवण करून दिली की, या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही केली आहे, तुमच्या सरकारने नाही.

रोमानियाच्या महापौरांनी तुम्ही फक्त तुमच्याबद्दल बोला असे शिंदे यांना म्हटले. यावर ज्योतिरादित्य शिंदे थोडे अस्वस्थ असल्याचे व्हिडिओत दिसले आणि एका प्रकारे नाराज होऊन मी काय बोलणार ते मी ठरवेन असे म्हणाले. महापौरांनी त्यांना पुन्हा सडेतोड प्रत्युत्तर देत तुम्ही तुमच्याबद्दल बोला, असे सांगितले. तेथे बसलेले विद्यार्थी टाळ्या वाजवत महापौरांना पाठिंबा देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

यानंतर ज्योतिरादित्य शिंद भारतीय विद्यार्थ्यांना म्हणाले की, “आमची योजना अशी आहे की आम्ही सर्व भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येक शिबिरातून बाहेर काढू. यासाठी रोमानिया सरकारचे खूप खूप आभार.”

दरम्यान, भारतातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तेथून त्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भारत सरकारचे मंत्रीही तेथे गेले आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील त्यापैकी एक आहेत.

काँग्रेस नेते सलमान निजामी यांनी व्हिडिओ ट्विट करून, “जुमला भारतात काम करतो पण परदेशात नाही. पहा रोमानियाच्या महापौरांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना रिलीफ कॅम्पमध्ये कसा धडा शिकवला, तुम्ही येथून कधी निघणार आहात. आम्ही मदत शिबिरात जागा आणि अन्न देत आहोत, तुम्ही नाही,” असे म्हटले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्याचे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war we gave food children romania mayor jyotiraditya scindia abn