नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय. एकीकडे अनेक देश हा संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशीही हे युद्ध सुरुच आहे.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय चर्चा झाली मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली, असं या फोनवरील चर्चेसंदर्भातील माहिती देणाऱ्या पत्रकारच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलंय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> मेट्रो स्थानकांत आश्रय, ATM समोरील रांगा, गाड्यांची गर्दी, रस्त्यावर तोफा अन्…; युक्रेन युद्धाची दाहकता दाखवणारे फोटो

‘लोकशाही मार्गाने आणि चर्चेमधून वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’ असंही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलताना सांगितल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”

अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा सर्वोच्च प्राधान्य…
युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या देशांमधील अधिकारी आणि संबंधित व्यक्ती या प्रकरणासंदर्भात सतत संपर्कात राहतील यावर शिक्कामोर्तबही केल्याचं सांगण्यात आलं आहे.

नक्की पाहा >> Video: रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियात दाखल झालेले पाकिस्तानी PM विमानातून उतरल्या उतरल्या म्हणाले…

भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी तेथील भारतीय दूतावासाने गुरुवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लष्करी कायदा लागू झाल्याने तिथे वाहतुकीत अडथळे येत असल्याने घरीच थांबण्याचे आवाहन दूतावासाने भारतीयांना केले. आपल्याला मायदेशी परत पाठविण्यासाठी दूतावासाकडून प्रयत्न करण्यात येत असून, तोपर्यंत घरातच थांबा, तसेच जवळच्या बॉम्बरोधक शिबिरांमध्ये आसरा घ्या, अशी सूचना राजदूतांनी केली.

भारताचा सावध पवित्रा
रशियाने युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केल्यानंतर पाश्चात्य देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला. भारताने मात्र सावध भूमिका घेतली. या घडामोडींबद्दल खेद व्यक्त करणारे निवेदन सरकारने गुरुवारी सकाळी प्रसृत केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय महासंघातील पदाधिकारी, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री यांच्यासह अनेकांशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. मात्र, भारत हा रशियाच्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध करत नसल्याचे चित्र पाश्चात्य देशांमध्ये निर्माण झाले.

नक्की वाचा >> Ukraine-Russia War: युक्रेनकडून प्रतिकार; रशियाची सहा विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक
रशियाच्या युक्रेनमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषय समितीची बैठक झाली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत़े. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तेथील भारतीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia vs ukraine war pm modi talks to putin calls for immediate ceasefire and dialogue scsg
Show comments