रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या कथित ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रशियानं असा हल्ला झाल्याचा दावा केला असून त्यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दुसरीकडे युक्रेनकडून या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यातच आता रशियाकडून थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना संपवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

बुधवारी रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या क्रेमलिन येथील निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर लागलीच व्हायरल होऊ लागली. हा हल्ला युक्रेननं केल्याचा दावा रशियानं केला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेन या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, रशियन सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून थेट अण्वस्र हल्ल्याची भीती रशियाकडून घालण्यात येत आहे.

“हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याबाबत राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन योग्य तो निर्णय घेतील. इथून पुढे काहीही होऊ शकतं. खरं तर हे थेट युद्ध नाही. आम्ही युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहिम राबवतो आहे. आमच्याकडे खूप अणवस्त्र देखील आहेत, याचा विचार युक्रेनने करायला हवा”, अशा शब्दांत रशियातील भारतीय वंशाचे खासदार अभय कुमार सिंग यांनी गंभीर इशारा दिला आहे.

“आमच्याकडे खूप अण्वस्रं आहेत, हे युद्ध…”, पुतिन यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर रशियाचा युक्रेनला गंभीर इशारा!

रशियाची खुली धमकी!

दरम्यान, एकीकडे युक्रेननं हल्ल्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केल्यानंतरही आता थेट अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनाच संपवण्याची भाषा रशियाकडून करण्यात आली आहे. “या दहशतवादी हल्ल्यानंतर आता झेलेन्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता झेलेन्स्कींना बिनशर्त शरणागती पत्करण्याच्या करारपत्रावर सही करण्याचीही गरज नाही”, अशा शब्दांत रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी युक्रेनला जाहीर इशारा दिला आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना संपवण्यासाठी युक्रेनचा ड्रोन हल्ला, VIDEO आला समोर

“सगळ्यांनाच माहिती आहे की हिटलरनंही अशा प्रकारच्या कोणत्याही करारपत्रावर सही केली नव्हती. अशा प्रकारची माणसं कायम दिसून येतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia warns to eliminate volodemyre zelensky after drone attacke on vladimir putin residence in kremlin pmw